लायन्स नेत्र रुग्णालय जागतिक दर्जाचे करण्यासाठी सर्वतोपरी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:03 PM2019-12-06T12:03:36+5:302019-12-06T12:08:34+5:30
नेत्रदीपक सोहळा : लायन्स आय हॉस्पिटलच्या विस्तारित शस्त्रक्रियागाराचे उद्घाटन
औरंगाबाद : औरंगाबादेतील लायन्स आय हॉस्पिटलच्या उभारणीत मी अगदी प्रारंभापासून जोडलेलो आहे, याचा मला अभिमान आहे. लायन्स क्लबच्या सदस्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाचा विस्तार झाला. येथील सुविधा अतिशय गुणवत्तापूर्ण आहेत. हे रुग्णालय जागतिक दर्जाचे बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे लायन्स क्लब आॅफ इंंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तथा रिपब्लिक आॅफ कोरियाचे डॉ. जंग यूल चॉई म्हणाले.
लायन्स क्लब आॅफ चिकलठाणातर्फे उभारण्यात आलेल्या आय हॉस्पिटलच्या विस्तारित ओटी प्रकल्पाचे गुरुवारी (दि.५) जंग यूल चॉई यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय निर्देशक डॉ. नवल मालू, लायन राजेंद्र दर्डा, प्रोजेक्ट चेअरपर्सन एम. के. अग्रवाल, लायन्स क्लब आॅफ चिकलठाणाचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, को-आॅर्डिनेटर राजेश भारुका, प्रकाश गोठी, सुनील व्होरा, नितीन बंग, विवेक अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास निधी अग्रवाल, दीपा भारुका, पूनम अग्रवाल, राजेश राऊत, डॉ. कुलदीप डोळे, डॉ. हिमांशू गुप्ता, तनसुख झांबड, महेश पंड्या, विशाल लदनिया, राज गोठी, दिलीप पटवर्धन आदींची उपस्थिती होती.
डॉ. जंग यूल चॉई म्हणाले, मला येथे आमंत्रित केल्याबद्दल आभारी आहे. सर्वांच्या मेहनतीमुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम होऊ शकला. मी यापुढे दोन वर्षे अध्यक्षपदावर असणार आहे. यामुळे रुग्णालयासाठी जी काही मदत हवी असेल नि:संकोच मागावी. मी आता ७६ वर्षांचा आहे. मात्र स्वत:ला ४६ वर्षांचा समजतो. आपण आयुष्यात अर्थपूर्ण गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. मी पौष्टिक खातो, स्वत:चे मनोरंजन करतो आणि ज्या संस्थेशी मी जोडले गेलो आहे, त्यासाठी खूप काम करतो. त्यातूनच तरुण आणि निरोगी राहण्यासाठी मदत होते, असे डॉ. चॉई म्हणाले.
एम. के. अग्रवाल म्हणाले, याठिकाणी खाजगी रुग्णालयाच्या बरोबरीने यंत्रसामुग्री आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शस्त्रक्रिया होतात. समाजाच्या कल्याणासाठी यापुढेही रुग्णालयाचा विस्तार होईल. नितीन बंग म्हणाले, औरंगाबादेत लायन्स नेत्र रुग्णालय असल्याचा अभिमान असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक होईल. सुनील व्होरा म्हणाले, ‘देणाऱ्याने देत जावे..’ याप्रमाणे रुग्णालयाचे काम सुरू आहे. या रुग्णालयाच्या उभारणीत राजेंद्र दर्डा आणि एम. के. अग्रवाल यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे ते म्हणाले. दीपक अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश गोठी यांनी प्रारंभी रुग्णालयाच्या संपूर्ण प्रवासावर प्रकाश टाकला. प्रकाश गोठी आणि भरत भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. राजेश भारुका यांनी आभार मानले. या प्रकल्पाचे आर्किटेक्ट म्हणून राजन नाडकर्णी यांनी काम पाहिले.
वर्षाला १० हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य
डॉ. नवल मालू म्हणाले, नेत्र रुग्णालयासाठी लायन्स क्लबच्या प्रत्येक सदस्य, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने आज हे यश मिळाले आहे. जागतिक दर्जाचे रुग्णालय होईल, यासाठी प्रयत्नशील आहोत. भविष्यात वर्षाला १० हजार नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागताने भारावले जंग यूल चॉई
लायन्स आय हॉस्पिटल येथे डॉ. जंग यूल चॉई यांचे आगमन झाले. यावेळी बालाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लेझीमचे सादरीकरण करून त्यांचे स्वागत केले. या अनोख्या स्वागताने ते भारावून गेले. लेझीम सादरीकरणाचा क्षण त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टर, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.