समृद्धीचे पाचही बछडे निघाल्या मादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:02 AM2021-01-18T04:02:26+5:302021-01-18T04:02:26+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वाघीण समृद्धीने मागील महिन्यात पाच बछड्यांना जन्म दिला होता. महापालिकेने रविवारी तज्ज्ञांच्या उपस्थित बछड्यांची ...
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वाघीण समृद्धीने मागील महिन्यात पाच बछड्यांना जन्म दिला होता. महापालिकेने रविवारी तज्ज्ञांच्या उपस्थित बछड्यांची तपासणी केली. हे सर्व बछडे मादी (वाघीण) आहेत. सर्व बछड्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी दिली.
समृद्धी वाघिणीने २५ डिसेंबर रोजी पहाटे पाच बछड्यांना जन्म दिला आहे. मागील १९ महिन्यांनंतर प्राणिसंग्रहालयात पाळणा हलला होता. बछड्यांसह आईची तब्येत चांगली असून, बछड्यांचे वजन वाढत आहे. या बछड्यांचे १५ दिवसानंतर डोळे उघडले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बछड्यांची तपासणी करण्यात आली. बछडे आईसमवेत खेळत आहेत. वाघिणीसह बछड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन शिफ्टमध्ये केअर टेकरची नियुक्ती केली आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे ऊब राखण्यासाठी रूम हिटरची व्यवस्था केलेली आहे. तीन महिने या बछड्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात येईल. सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. व्हीआयपी मंडळींनाही पाहण्यासाठी प्रवेश देण्यात येत नाही.
माद्यांची संख्या पोहोचली नऊवर
समृद्धीने आत्तापर्यंत तब्बल १२ बछड्यांना जन्म दिला. यापूर्वी १२ नोव्हेंबर २०१६ला तिने एक नर, दोन मादी अशा तीन बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ला समृद्धीने एक नर तीन माद्यांना जन्म दिला होता. आता पुन्हा पाच मादी बछड्यांना तिने जन्म दिला.