वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 05:40 PM2022-01-02T17:40:03+5:302022-01-02T17:42:32+5:30
२५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तालुक्यातील लिहाखेडी येथील एका ९० वर्षीय महिलेचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. २५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले. तिन्ही बहिणींनी अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार स्वतः करत मृतदेहास अग्निडाग देत आपले कर्तव्य बजावले. वृद्धापकाळात आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या उच्चपदस्थ मुलांबाबत नागरिक आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९० वर्ष रा.लिहाखेडी ता.सिल्लोड हल्ली मुक्काम औरंगाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.तर अंत्यसंस्कार पार पाडणाऱ्या मुलींचे नावे सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे रा.औरंगाबाद, सुनीता शिवाजी सोने रा.अनवी, जिजाबाई उत्तम टाकसाळे रा.कोटनांद्रा, जाऊ छायाबाई शिरसाठ रा.लिहाखेडी ता.सिल्लोड असे आहेत.
चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांना तीन मुले आणि तीन मुली आहे. मोठा मुलगा औरंगाबाद येथे कृषी अधिकारी होता तो आता निवृत्त झाला आहे.मधला मुलगा हायकोर्टात क्लर्क आहे. तर लहान मुलगा एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून तिन्ही मुलांना मोठे केले नोकरीला लावले, पण स्थिर झाल्यानंतर शुद्ध हरपलेल्या या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार देत घरातून हाकलून दिले. यामुळे औरंगाबाद येथे राहत असलेल्या सुभद्रा व श्रीकृष्ण टाकसाळे या मुलीने व जावयाने त्यांचा सांभाळ केला. मागील २० वर्षांपासून त्या या मुलीकडे राहत होत्या.
मुली व जावयाने तिन्ही मुलांना अनेक वेळा फोन केला आईची तब्बेत खूप खराब आहे भेटायला या पण ते आले नाही. आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ औरंगाबाद येथे बहिणीच्या घरी आले. आईचे शेवटचे दर्शन न घेता पाहुण्यांसारखे लांब उभे राहिले. सर्वात मोठा मुलगा तर आईच्या अंतिमसंस्कारसाठी आलाच नाही. हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी, हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळी तसेच नातलगांनी आईच्या मृतदेहालासुद्धा त्या मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला. शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी व जाऊ छायाबाई शिरसाठ यांनी सर्व अंतिमसंस्कार पार पाडले.
आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे केले आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात,आजारपणात त्यांनी लक्ष दिले नाही. घरातून हाकलून दिले ती आजारी असताना तिला जिवंतपणी भेटायला आले नाही. इतकेच नव्हे तर मोठा मुलगा अंतिमसंस्कारासाठी ही आला नाही अशा निर्दयी मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर मुलगी सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंत्यसंस्कारावेळी माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह परिसरातील नागरिक, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.