सर्व ‘कन्फ्युजन’ झाले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:16 AM2018-05-28T01:16:43+5:302018-05-28T01:17:20+5:30
लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळालेल्या विविध प्रकारच्या माहितीमुळे सर्व प्रकारचे कन्फ्युजन दूर झाले असल्याची प्रतिक्रिया फेअरमधून बाहेर पडताना पालकांसह विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : करिअर निवडण्यासाठी कन्फ्युजन होते. हे निवडावे की ते... असा प्रश्न मनात घोळत होता. मात्र, लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळालेल्या विविध प्रकारच्या माहितीमुळे सर्व प्रकारचे कन्फ्युजन दूर झाले असल्याची प्रतिक्रिया फेअरमधून बाहेर पडताना पालकांसह विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. या फेअरचा रविवारी (दि.२७) सायंकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात समारोप झाला.
करिअरच्या अनेक वाटा दाखवून विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यात मोला वाटा उचलणाऱ्या लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरचा उत्साहात समारोप झाला. शुक्रवारी सकाळी सुरू झाल्यापासून रविवारी सायंकाळी ९ वाजता समारोप होईपर्यंत हजारो पालक, विद्यार्थ्यांनी फेअरला भेट देऊन आपल्या करिअरची निवड केली. उच्च दर्जाचे शिक्षण देणारी महाविद्यालये, अभ्यासक्रम याची माहिती अत्यंत कमी वेळेत आणि विनामूल्य मिळाली. या फेअरमध्ये भेट देऊन बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेह-यावर समाधानाच्या छटा दिसून येत होत्या.
प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांची विशेष गर्दी दिसून आली. करिअर घडविण्यात मैलाचा दगड ठरणा-या या फेअरला भेट देण्याची संधी चुकूनही हुकवायची नाही, असा जणू शहरातील विद्यार्थ्यांनी निश्चयच केला होता.
केवळ शहरातील नव्हे तर आसपासच्या गावांतीलही अनेक विद्यार्थी खास लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरसाठी शहरात आले असल्याचे दिसून आले. फेअरच्या आयोजनामागील हेतू शंभर टक्के यशस्वी झाला. मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, इंटेरिअर डिझायनिंग, रिटेल, व्यवसाय, आयटीआय, फार्मसी, अॅनिमेशन, अॅग्री, मीडिया, अशा शेकडो अभ्यासक्रमांची माहिती लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळाली.
निकालाच्या अगोदर माहिती मिळाल्याचा फायदा
दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. या निकालाच्या अगोदरच सर्व अभ्यासक्रमांची माहिती लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळाली. याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी, पालकांनी बोलताना दिली.
बौद्धिक चाचणीलाही उदंड प्रतिसाद
शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअरसंबंधी बौद्धिक चाचणी तीन दिवस सकाळी ११ वा. आणि सायंकाळी ६ वाजता घेण्यात आली. या चाचणीलाही विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चाचणीनंतर विद्यार्थ्यांना ‘करिअर ग्यान’ हे पुस्तक भेट देण्यात आले.