अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ३ नोव्हेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:40 AM2017-10-17T01:40:11+5:302017-10-17T01:40:11+5:30
अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित केले जाणारे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी प्राचार्या बीबी फातिमा बालेखां मुजावर, तर रामशेठ ठाकूर स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. इक्बाल मिन्ने यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
‘यंदा हे संमेलनाचे ११ वे वर्ष असून, तीन दिवस रसिकांना विविध साहित्य कार्यक्रमांची रेलचेल अनुभवयाची संधी मिळणार आहे. हे संमेलन केवळ मुस्लिमांचे नसून सर्वांचेच आहे, असे ते म्हणाले. राज्यभरातून व राज्याबाहेरून सुमारे एक हजार साहित्यिक व आठ ते दहा हजार रसिक हजेरी लावतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी संमेलनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी अन्न, नागरी पुरवठामंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात मुस्लिम कवयित्री संमेलन, कविसंमेलन, मिलाजुला मुशायरा, विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे, मंडळाचे अधिवेशन व सर्वसाधारण सभा असे कार्यक्रम होणार आहेत.
साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संमेलनाचा ५ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे. यावेळी मुस्लिम मराठी नवसाहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे. ‘मंडळाला संमेलनासाठी शासनातर्फे कोणतेही अनुदान वा आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे गेल्या २५ वर्षांत केवळ दहाच संमेलने घेऊ शकलो’, अशी खंत यावेळी डॉ. मिन्ने यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदेत लियाकत अली पटेल, आरेफ शेख, शमीम सौदागर, अन्वर जावेद शेख आदी उपस्थित होते.