चाळीस आमदारांसाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस, जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला
By स. सो. खंडाळकर | Published: September 19, 2022 06:13 PM2022-09-19T18:13:07+5:302022-09-19T18:13:40+5:30
हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. त्यांच्यात सोबत गेलेल्या लोकांमध्ये हळूहळू नाराजी उघड होत आहे
औरंगाबाद - राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष फक्त त्यांच्या सोबत असलेल्या चाळीस आमदारांच्या मतदार संघाकडे आहे. त्यामुळे उर्वरित मतदार संघांकडे दुर्लक्ष होत आहे. तर सध्या आमच्यावर टीका करताना त्यांना कोणीतरी ते लिहून देत आहे आणि त्यांचा गुलाम त्याच्या व्यतिरिक्त काही बोलणार नसेल तर मजा येणार नाही अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
नुकतीच माहिती समोर आली आहे की भाजपचे काही लोक शिंदे गटात शमील झाले. त्यामुळे भाजपने सतर्क राहण्याची गरज आहे. तर उपमुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र झालं उलट त्यामुळें ते नाराज आहेत. त्यांची एकदा भाजपची गणित जुळली तर ते सरकार बरखास्त करतील त्यावेळी एकनाथ शिंदे यांना तिकडे गेल्याची चूक लक्षात येईल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
मुख्यमंत्री नुसत्या मोठ्या घोषणा करत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांच्या मतदारसंघात नुसतं लक्ष देऊन उर्वरित 248 मतदार संघाच्या तोंडाला पाणी पुसणार आहात का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. त्यांच्यात सोबत गेलेल्या लोकांमध्ये हळूहळू नाराजी उघड होत आहे, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
राज्यात महाविकास आघाडीनुसार निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. मात्र स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याचा ठरवण्यात आला आहे. आमच्या स्थानिक नेत्यांनी इतर दोन पक्षांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू ठेवायचा का? याबाबत निर्णय घ्यावा असा सूचना देण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.