मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको
By बापू सोळुंके | Published: November 18, 2023 07:17 PM2023-11-18T19:17:33+5:302023-11-18T19:18:07+5:30
यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केले
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले आहे, यापार्श्वभूमीवर येथील जनतेच्या संतप्त भावनांचा आता उद्रेक होत आहे. २० नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने सिंचनभवनसमोर जालना रोडवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल पटेल यांनी येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या पत्रकार परिषदेत दिली.
अनिल पटेल म्हणाले की,अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महसूलमंत्री विखे पाटील यांनी मराठवाड्याला पाणी न देण्याचा ठराव घेतला. अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीत ठराव घेता येत नाही, हे मंत्री विखे यांना माहिती नाही का, असा सवाल आमचा आहे. मराठवाड्यातील जनतेच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी घेतला. या निर्णयाविरोधात नगर आणि नाशिककरांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या दोन्ही याचिकांमध्ये न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिलेली नाही. असे असताना केवळ नगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापुढे पाणी मिळू शकले नाही.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय pic.twitter.com/sHZDhbwOQf
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 18, 2023
यामुळे आम्ही आता मराठवाडा पाणी जनआंदोलन उभारले आहे. २० नोव्हेंबर रोजी सिंचन भवनसमोर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदाेलनात माजीमंत्री राजेश टोपे, विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्यासह, सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आ. डॉ.कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास भुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पांडुरंग तांगडे, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, प्रा.आर.एम.दमगिर आदींची उपस्थिती होती.