कार्यकर्त्याने उडविली सगळ्यांचीच झोप

By Admin | Published: September 25, 2014 01:00 AM2014-09-25T01:00:18+5:302014-09-25T01:01:16+5:30

औरंगाबाद : बसपाचे तिकीट नाकारल्यामुळे खवळलेल्या एका इच्छुक उमेदवाराने आपल्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी केलेल्या खोडसाळपणामुळे बसपा नेते, कार्यकर्त्यांबरोबरच यंत्रणेची झोप उडवून टाकली.

All the people fired by the party volunteer | कार्यकर्त्याने उडविली सगळ्यांचीच झोप

कार्यकर्त्याने उडविली सगळ्यांचीच झोप

googlenewsNext

औरंगाबाद : बसपाचे तिकीट नाकारल्यामुळे खवळलेल्या एका इच्छुक उमेदवाराने आपल्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी केलेल्या खोडसाळपणामुळे बसपा नेते, कार्यकर्त्यांबरोबरच पोलीस आणि महसूल यंत्रणेची झोप उडवून टाकली. हॉटेलमध्ये बसपाचे नेते पैसे वाटप करीत असल्याचा खोटा फोन करून त्याने पोलीस, निवडणूक विभागाची अख्खी यंत्रणा कामाला लावली. या फोननंतर तब्बल सहा तास जागून पोलीस आणि निवडणूक विभागाने केलेल्या कारवाईनंतर हा निव्वळ खोडसाळपणाच असल्याचे स्पष्ट झाले.
त्याचे झाले असे की, बसपाचे राज्याचे प्रभारी खा. वीरसिंह व इतर नेते मंडळी मंगळवारी मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी औरंगाबादेत आली होती. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये त्यांनी उमेदवार निवडीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या नेत्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. जालना जिल्ह्यातील एका मतदारसंघातून बसपातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून औरंगाबादेतील एक कार्यकर्ता इच्छुक होता. सर्व प्रयत्न केले; परंतु पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अंतिम उमेदवार यादीत या कार्यकर्त्याचे नावच आले नाही. आपला पत्ता कट झाल्याचे समजताच हा कार्यकर्ता खवळला. पैसे घेऊन तुम्ही तिकिटे वाटल्याचा आरोप करीत या कार्यकर्त्याने काही काळ हॉटेलमध्ये गोंधळ घातला.
त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास या कार्यकर्त्याने पोलीस नियंत्रण कक्षास फोन केला आणि ‘हॉटेलमध्ये बसपाचे काही नेते उमेदवारांना पैशांचे वाटप करीत आहेत. त्यांच्याकडे एक कोटीच्या आसपास रक्कम आहे’. नियंत्रण कक्षाने ही माहिती तात्काळ सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळविली आणि तातडीने ‘त्या’ हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले.
सहा तास चालली कारवाई
माहिती मिळताच सिडको एमआयडीसीच्या निरीक्षक निर्मला परदेशी या आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने हॉटेलवर पोहोचल्या. बसपाचे नेते ज्या खोलीत थांबलेले होते, त्या तिन्ही खोल्यांचा पोलिसांनी ताबा घेतला. वास्तविक पाहता निवडणुकीच्या काळात पैसे वाटप करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ही निवडणूक विभागाने नियुक्त केलेल्या भरारी पथकाची आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक परदेशी यांनी या पथकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
धक्कादायक बाब म्हणजे एकाही अधिकाऱ्याने फोन उचलला नाही. शेवटी पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईसाठी पथक पाठविण्यास सांगितले. तेव्हा रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकातील एक अधिकारी तेथे पोहोचले. त्यानंतर झडतीच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

Web Title: All the people fired by the party volunteer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.