सर्वच वयोगटाला वाटतेय, ‘प्रेमाचे बाजारीकरण नको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 04:23 PM2019-02-12T16:23:18+5:302019-02-12T16:29:12+5:30
फेब्रुवारी महिना उजाडताच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणाऱ्यांना आणि याला विरोध करणाऱ्यांनाही याचे वेध लागतात.
औरंगाबाद : ‘प्रेमाला मर्यादा नाहीत’, ‘जे जे नवे ते स्वीकारायला हवे’, ‘आपल्या संस्कृतीला धरून राहा’, ‘सगळे करतात म्हणून करतो’, अशी भन्नाट मते आजच्या तरुण आणि ज्येष्ठांची ‘व्हॅलेंटाईन डे’वर आहेत; मात्र या सगळ्यात प्रेम या पवित्र भावनेचे बाजारीकरण व्होऊ नये अशी सार्वत्रिक अपेक्षा ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास कें द्राच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘व्हॅलेंटाईन : व्यक्ती आणि विचार’ या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
फेब्रुवारी महिना उजाडताच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणाऱ्यांना आणि याला विरोध करणाऱ्यांनाही याचे वेध लागतात. दरवर्षी याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास कें द्राच्या कोमल जाधव या विद्यार्थिनीने ‘व्हॅलेंटाईन : व्यक्ती आणि विचार’ या सर्वेक्षणाचा विचार शिक्षकांजवळ मांडला.
त्यांच्या मार्गदर्शनानंतर मेघना मराठे, गणेश सोनवणे, दीपक पगारे यांच्या मदतीने विद्यापीठ, विविध महाविद्यालये, बाजारपेठा येथे सर्वेक्षण करण्यात आले. यातील उत्तरदात्यांत १७ ते ७५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, नोकरदार, दुकानदार, हॉटेल चालक यांचा समावेश आहे. यातून काही मजेशीर, तर काही विचार करायला भाग पाडणारी मते समोर आली आहेत.
सर्व करतात म्हणून करतो
मैत्री, जिव्हाळा, काळजी, त्याग, विश्वास नि:स्वार्थीपणा अशा प्रेमाच्या व्याख्या यावेळी उत्तरादात्यांनी केल्या; मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ का साजरा करतात, यावर कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. माहिती नाही, सर्व करतात म्हणून, पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम, प्रेमाचा अंत झाला होता, व्हॅलेंटाईन या व्यक्तीच्या आठवणीत साजरा करतात, अशी भन्नाट उत्तरे यावेळी मिळाली, तर याच्या साजरीकरणावर हा दिवस केवळ तरुणाईसाठी नसून प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी आहे, यातून भावना व्यक्त होतात, चांगले आहे; पण काही मर्यादा हव्यात, अशी उत्तरे मध्यमवयीनांमधून आली, तर हे चुकीचे आहे, याने आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होतो, अशी मतेही काही जणांनी नोंदवली. यासोबतच काहींनी काळासोबत बदलावे, जे चांगले आहे ते स्वीकारावे, अशी भूमिका मांडली, तर हे चुकीचे आहे, यास विरोध करावा, पाश्चात्य सर्वच स्वीकारावे असे नाही, अशी मते काहींनी मांडली.
ठराविक दिवसाची गरज नाही
या दिवसाकडे कसे पाहता, यावर हा दिवस दुरावलेल्या नातेसंबंधांना जवळ आणणारा आहे, आम्ही वाईट नजरेने पाहतो अशा भावना काहींनी व्यक्त केल्या, तर काहींनी प्रेमाला सीमा नाहीत, ठराविक दिवशीच साजरा करू नये, असे मत नोंदवले, तसेच याला प्रत्युत्तर म्हणून काही ठिकाणी मातृ-पितृ दिन साजरा केला जातो यावर हे चुकीचे आहे, दोन्हीही दिवस चांगले आहेत अशी संमिश्र उत्तरे दिली, तसेच ८० टक्के उत्तरदात्यांनी हा दिवस नेहमीप्रमाणे असतो, असे उत्तर दिले. या प्रत्येक उत्सवाकडे धार्मिक नजरेने पाहू नये, प्रेमाला कोणता धर्म नाही, असे मत एका प्रश्नावर नोंदवले. प्रेमात मिळालेला नकार आजची तरुणाई स्वीकारू शकत नाही असे मत ९५ टक्के उत्तरदात्यांनी नोंदवले. यातून नैराश्य, आत्महत्या, त्रास देणे असे प्रकार होतात, असे मत नोंदवत नकाराचा आदर करावा, दुसरा प्रयत्न करावा, जाणीव करून द्यावी, अशा भूमिका मांडल्या.
बाजारपेठेवर होतो सकारात्मक परिणाम
या सात दिवसांत बाजारपेठेत गिफ्टस्, फुले, केक, चॉकलेट याच्या विक्रीत वाढ होत असल्याचे पुढे आले आहे. च्हॉटेल व्यवसायातसुद्धा वाढ होते; मात्र ते या दिवसासाठी ठरवून विशेष नियोजन टाळत असल्याचे काहींनी सांगितले, तसेच दिवसेंदिवस हा आठवडा उत्सवी स्वरूपात कसा साजरा होईल यासाठी बाजारपेठा लक्ष देतात, यातून सातही दिवस वेगवेगळे गिफ्टस्, चॉकलेटस्, ग्रीटिंग्ज यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते.
प्रेमाकडे डोळसपणे पाहावे
या दिवसाला होणारा विरोध पाहता नेमक्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अपेक्षेप्रमाणे काहींनी उडवाउडवीची, तर काहींनी खूप समंजसपणे उत्तरे दिली; मात्र या सर्वात प्रेमाचे होणारे बाजारीकरण आणि आशय सोडून उत्सवी स्वरूप हे मन खिन्न करणारे आहे. यामागचे अर्थकारण पाहता सर्वांनी प्रेम या संकल्पनेकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
- कोमल जाधव, विद्यार्थिनी