अडथळ्यांची ‘स्टार्टिंग लाइन’ ओलांडल्यास सारे शक्य; औरंगाबादची कन्या न्यूयॉर्कच्या वैद्यकीय सेवेत बजावते महत्वाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 07:40 PM2021-03-08T19:40:46+5:302021-03-08T19:41:07+5:30
International Women's Day : आईच्या पोटातील गर्भाच्या हृदयाचा दोष दूर करण्यात बजावतात महत्त्वपूर्ण भूमिका
औरंगाबाद : परदेशात जाऊन वैद्यकीय क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणे खरोखरच आव्हानात्मक आहे. म्हणूनच हे आव्हान यशस्वीपणे पेलून स्वत:सोबतच भारताचे नावही मोठे करणाऱ्या डॉ. अपर्णा कुलकर्णी- पटवर्धन या औरंगाबादच्या लेकीचे कर्तृत्वही मोठे ठरते.
कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रचंड मेहनत, आपल्या क्षेत्रावरचे जीवापाड प्रेम आणि कामातली तत्परता या जोरावर डॉ. अपर्णा यांनी न्यूयॉर्कमधे स्वत:ची ओळख निर्माण केली. १९९८ साली त्या न्यूयॉर्कमध्ये गेल्या. सध्या तेथील कोहेन चिल्ड्रन मेडिकल सेंटर येथे पेडियाट्रीक कार्डिओलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. अपर्णा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्या असोसिएट प्रोफेसर असून ॲको कार्डिओलॉजी या शाखेत कार्यरत आहेत. ॲको कार्डिओलॉजी म्हणजे लहान बाळाच्या हृदयाचा सोनोग्राम करणे. गर्भाचे हृदय तयार होताना जर त्यात काही दोष असले तर ते सोनाग्राममधून दिसून येतात आणि त्याचे उपचार करता येतात. यावरूनच या शाखेची क्लिष्टता आणि त्यासाठी लागणारी एकाग्रता लक्षात येते. लहान मुलांची हार्ट सर्जरी अजूनही भारतात केवळ मोठ्या शहरातच होते. याउलट अमेरिकेत मात्र अगदी लहान गावातही ही सुविधा मिळू शकते. हा आरोग्य क्षेत्रातला मोठा फरक कायम जाणवतो, असे डॉ. अपर्णा यांनी सांगितले.
दाबेली अन् पेढ्यांची रंगत न्यारी
औरंगाबादच्या खूप गोष्टी मी मिस करते. दोन गोष्टी मला खूप जास्त आठवतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे औरंगाबादला मिळणारी दाबेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अप्पा हलवाई यांचे पेढे. जेव्हा कोणी औरंगाबादहून येणार असेल, तेव्हा माझे आई- बाबा त्यांच्यासोबत माझ्यासाठी पेढे नक्की पाठवतात. औरंगाबादच्या दाबेली अन् पेढ्यांची रंगतच न्यारी, असेही डॉ. अपर्णा यांनी सांगितले.
मुलींसाठी स्टार्टिंग लाइन ओढू नका
मुलींसाठी कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना जी ‘स्टार्टिंग लाइन’ असते, ती नेहमी मागे ओढली जाते. मुलांसाठी आणि मुलींसाठी ती रेषा वेगवेगळी असते. त्यामुळे पालकांनी मुलींना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी युनिक गोष्ट असते. ती एकदा समजली की, मग तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही, असे डॉ. अपर्णा यांनी स्पष्ट केले.
- अपर्णा कुलकर्णी, असोसिएट प्रोफेसर