स्वाधार शिष्यवृत्तीसाठी सारेच बेजार; पोर्टल होतेय सतत हँग
By विजय सरवदे | Published: May 6, 2024 07:53 PM2024-05-06T19:53:31+5:302024-05-06T19:54:06+5:30
समाजकल्याणसाठी ‘व्हीपीडीए’ प्रणाली ठरतेय डोकेदुखी
छत्रपती संभाजीनगर : स्वाधार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट’ (व्हीपीडीए) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यासंबंधीचे पोर्टल सातत्याने हँग होत असल्यामुळे समाजकल्याण विभागाचे कर्मचारी बेजार झाले असून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत अवघे १५०-२०० एवढेच अकाउंट तयार करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
आतापर्यंत ‘आरटीजीएस’ पद्धतीने विद्यार्थ्यांच्या खात्यावर ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जात होती. मात्र, शासनाने अनुदानाच्या सर्वच योजनांसाठी ‘व्हीपीडीए’ प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाचे कर्मचारी सध्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीच्या लाभधारक विद्यार्थ्यांचे अकाउंट तयार करण्यात व्यस्त आहेत. राज्यभरातील विविध विभागांचा ‘व्हीपीडीए’ पोर्टलवर भार वाढल्यामुळे ते सतत हँग पडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक तर सुटीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेनंतर अकाउंट तयार करावे लागत आहे. दुसरीकडे, अकाउंट तयार करताना काही बँकांचे आयएफसी कोड मॅच होत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांच्या पोस्टाच्या बँकेचे कोडही अप्रूव्ह होत नाहीत. त्यामुळे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. कॅन्सल चेक गरजेचे आहे. पण, अनेक विद्यार्थ्यांकडे चेक नाहीत. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या बँक पासबुकची कलर झेरॉक्स घेतली जात असून तसे कोषागार कार्यालयास कळविण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांच्या स्वाधार शिष्यवृत्तीसाठी मार्चअखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची तयारी सुरू असतानाच ही ‘व्हीपीडीए’ नवीन पद्धत लागू झाली. त्यामुळे तब्बल साडेपाच हजार विद्यार्थी रखडले आहेत. या विद्यार्थ्यांचे जस जसे अकाउंट तयार होतील, त्यानुसार त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार आहे.
जूनमध्ये प्रतीक्षा यादी जाहीर
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज जमा झाले असून अर्ज पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधारणपणे जूनमध्ये या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या विद्यार्थ्यांनीही पॅनकार्ड, खाते असलेल्या बँकेचा ‘आयएफसी’ कोड, कॅन्सल चेक तयार ठेवावेत, असे आवाहनही या कार्यालयाने केले आहे.