आता बँकेत फक्त प्रवेश शुल्कच लावणे बाकी; व्यवहार न करताही करतात हजार रुपये वसुल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:19 PM2022-06-17T13:19:38+5:302022-06-17T13:20:32+5:30

खातेधारकांची आर्थिक लूट : २० पेक्षा अधिक सेवेवर आकारले जातेय शुल्क

All that is left is to charge the bank an entry fee; They recover thousands of rupees without any transaction | आता बँकेत फक्त प्रवेश शुल्कच लावणे बाकी; व्यवहार न करताही करतात हजार रुपये वसुल

आता बँकेत फक्त प्रवेश शुल्कच लावणे बाकी; व्यवहार न करताही करतात हजार रुपये वसुल

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : महागाईतही सामान्य नागरिक भविष्यातील तरतूद म्हणून पगारातील काही रक्कम बाजूला काढून ठेवतात व खात्यात जमा करतात; पण बँका ठेवीवर जास्त व्याजदर देण्यापेक्षा खातेदारांकडूनच विविध सेवाशुल्क आकारत आहेत. आजघडीला २० पेक्षा अधिक सेवांच्या नावाखाली बँका भरमसाठ शुल्क वसूल करीत आहेत. आता फक्त बँकेत प्रवेश करण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क घेणे बाकी ठेवले असून, भविष्यात तो नियमही लागू होईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

व्यवहार न करताही हजार रुपये वसुली
बँका विविध सेवांसाठी जी रक्कम आपल्या खात्यातून कापून घेतात, त्याची अनेकदा त्या खातेदाराला माहिती नसते. कधी मोबाइलवर मेसेज येतात; पण आपण दुर्लक्ष करतो. व्यवहार केले नाहीत, तरी अकाऊंट मेंटेनन्स, एटीएम मेंटेनन्स, एसएमएस चार्जेस, वार्षिक फीस अशा नावाखाली खातेदाराकडून चारशे ते हजार रुपये बँका वसूल करतातच.

राष्ट्रीयीकृत बँका कोणत्या सेवेवर साधारण किती शुल्क आकारतात ?
सेवेचा प्रकार/शुल्क

१) मिनिमम बॅलन्स २०० ते ६०० रु.
२) डुप्लिकेट पासबुक - ११८ रु.
३) त्यावर शंभर व्यवहारांच्या नोंदी- ४०० रु.
४) अकाऊंट मेंटेनन्स चार्जेस ३०० ते १००० रु.
५) चेकबुक चार्जेस - १०० ते ५०० रु.
६) खाते सक्रिय नसेल तर - १०० ते ६०० रु.
७) चेक बाऊन्स दंड - २०० ते २००० रु.
८) बँक स्टेटमेंट फी - १०० रु. (प्रत्येक पान)
९) एटीएम अलर्ट चार्जेस १२ ते २२ रु.
१०) एटीएम मेंटेनन्स - ११८ रु.
११) नवे एटीएम कार्ड - २५० रु.
१२) एटीएम वार्षिक फी २०० ते ३०० रु.

बँकेकडून ग्राहकांची लूट
मध्यंतरी बँकांना उद्योजकांनी बुडविले. एनपीए वाढले. त्याची भरपाई करण्यासाठी बँकांनी खातेदारांकडून भरमसाठ सेवाशुल्क आकारणी सुरू केली. खातेदाराला ठेवीवर कमी व्याज देणे व त्याच्याकडून सेवाशुल्क वसूल करणे हे अन्यायकारक आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी मोफत सेवा द्याव्यात किंवा काही सेवांवर किमान शुल्क आकारावे.
- देवीदास तुळजापूरकर, महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन

बँकांचा नफा वाढ खातेदारांना फटका
बँकांनी २० पेक्षा अधिक सेवावर भरमसाठ शुल्क आकारणी सुरू केली. यामुळे बँकांचा नफा वाढला; पण सर्वसामान्य खातेदाराला त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयईए

Web Title: All that is left is to charge the bank an entry fee; They recover thousands of rupees without any transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.