९२ वर्षीय पित्याकडे तिन्ही मुलांनी फिरवली पाठ; कडाक्याच्या थंडीत ३ दिवस काढले अंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:16 IST2024-12-05T18:14:42+5:302024-12-05T18:16:35+5:30
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला पोटभर जेऊ घातले; मुलाचे समुपदेशन केल्यावर मुलाने वडिलांना सोबत घेऊन घर गाठले.

९२ वर्षीय पित्याकडे तिन्ही मुलांनी फिरवली पाठ; कडाक्याच्या थंडीत ३ दिवस काढले अंगणात
वाळूज महानगर : चांगल्या हुद्यावर असणाऱ्या आणि शासकीय नोकरीतून निवृत्ती घेणाऱ्या पोटच्या मुलांनी ९२ वर्षीय वृद्ध वडिलांना सांभाळण्यास असमर्थता दर्शविल्याने वृद्धाचे तब्बल तीन दिवस उपाशीपोटी हाल झाले. अखेर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला पोटभर जेऊ घालून मुलाचे समुपदेशन केल्यावर मुलाने वडिलांना सोबत घेऊन घर गाठले.
नगर तालुक्यातील गावात राहणाऱ्या ९२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तीन मुले आहेत. त्यातील सर्वांत मोठा मुलगा जलसंपदा विभागामध्ये शासकीय नोकरी करून सेवानिवृत्त झाला आहे, तर दुसरा मुलगा सिडको वाळूज महानगर-१ येथे वास्तव्यास असून एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो, तर तिसरा सर्वांत लहान मुलगा व्यावसायिक असून, तो नगर तालुक्यात कापड दुकान चालवतो. तिन्ही मुलांची आर्थिक परस्थिती अतिशय चांगली असूनही वृद्धावर तीन दिवस अंगणात उपाशी बसून दिवस काढण्याची वेळ आली.
कडाक्याच्या थंडीत तीन रात्री अंगणात
सर्वांत मोठ्या मुलाने, ‘मी दहा वर्षांपासून वडिलांची सेवा केली, यापुढे तू त्यांचा सांभाळ कर’ असे म्हणून वडिलांना नगर जिल्ह्यातून वाळूज महानगरात राहणाऱ्या मधल्या भावाकडे सोडले. वडिलोपार्जीत प्रॉपर्टीचा वाद सुरू असल्याने मोठा भाऊ मधल्या भावाच्या घराचा उंबरठा ओलांडून आत गेला नाही. वडिलांना सोडून तो माघारी फिरताच मधला भाऊ रुग्णालयाचे काम असल्याचे सांगून घराला कुलूप ठोकून परिवारासह निघून गेला. मुलगा येईल या आशेवर वृद्ध वडिलांनी उपाशीपोटी थंडीमध्ये तीन रात्री अंगणात काढल्या.
मोठ्या मुलाकडे केले स्वाधीन
अखेर नागरिकांकडून ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी धाव घेत मुलांशी संपर्क साधला असता मालमत्तेवरून वाद असल्याचे, शिवाय काकांनी आजोबांना सोडताना शिवीगाळ केल्याचे सांगून याप्रकरणी विवाहित नातीच्या तक्रारीवरून काकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याे समजले. पोनि. कृष्णा शिंदे यांच्या आदेशाने पोहेकॉ संदीप घाडगे यांनी नगर जिल्ह्यातील मुलाला बोलावून घेत अखेर ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता वृद्ध वडिलांना त्यांच्या स्वाधीन केले.