चिमुकलीवर अत्याचाराचा कांगावा अन् पतीसाठी रचलेला डाव महिलेवरच उलटला, तिघींवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:17 PM2023-06-24T13:17:23+5:302023-06-24T13:18:20+5:30
शहानिशा न करता चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा कांगावा; अतिउत्साही सामाजिक कार्यकर्तीने पोलिसांची उडवली झोप
वाळूज महानगर : कुठलीही शहानिशा न करता एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा कांगावा सोशल मीडियावर करून अतिउत्साही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांना कामाला लावले. या संवेदनशील प्रकरणामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे समजले.
सामाजिक कार्यकर्त्या बाईंनी गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर टाकलेल्या मेसेजमध्ये आंबेलोहळ परिसरातील एका महिलेच्या आठवर्षीय नातीवर तिचा आजोबा लैंगिक अत्याचार करतो. त्यातून या चिमुकलीच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक स्वाती उचित, पो. कॉ. अविनाश ढगे यांना क्रांती चौकात थांबलेल्या चिमुकलीच्या नातलग तक्रारदार महिलेकडे रवाना केले.
पोलिस पथकाने क्रांती चौकात जाऊन तक्रारदार महिला व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता जाधव यांच्याकडे चौकशी केली असता आठवर्षीय चिमुकली १७ एप्रिल रोजी हरविली असून तिच्या चुलत आजोबांनीच तिला उचलून नेल्याचे सांगितले. चिमुकलीवर आजोबाने अत्याचार केला असून चिमुकलीचा शोध लागत नसून तिचे बरे-वाईट झाल्याचा संशय व्यक्त करीत डॉ. लता जाधव यांनी पोलिस ढिम्म असल्याचा आरोप केला. जाधव यांनी पोलिस पथकासोबत अरेरावी केली.
पतीला अडकविण्यासाठी खोटी तक्रार
नंतर पोलिस पथक अंबेलोहळला गेले. त्यांना चिमुकली तिच्या चुलत आजोबांसोबत हसत-खेळत असल्याचे दिसले. तक्रारदार महिला ही या आजोबांची दुसरी पत्नी असून, त्या चिमुकलीचे आई-वडील एका गुन्ह्यात कारागृहात आहेत. तक्रारदार महिला चिमुकलीला भीक मागायला लावत होती म्हणून आजोबांनी तिला स्वत:कडे ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. रात्रीच पोलिसांनी चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करवली असता तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे उघड झाले. घरगुती वादातून पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी महिलेने कट रचल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
पोलिसांना कामाला लावणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
सामाजिक कार्यकर्त्या लता जाधव व कौशल्या गाढे यांनी शहानिशा न करता खोटा संदेश व्हायरल केला. उपनिरीक्षक स्वाती राऊत यांच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता जाधव, कौशल्या गाडे व तक्रारदार महिला या तिघींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.