वंचित-ठाकरे गट युती केवळ मुंबई महापालिकेपुरती; बाळासाहेब आंबेडकरांनी केले स्पष्ट
By स. सो. खंडाळकर | Published: January 16, 2023 08:00 PM2023-01-16T20:00:55+5:302023-01-16T20:01:53+5:30
उद्धव ठाकरे यांना मी काँग्रेसवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला आहे.
औरंगाबाद : ठाकरे गटाशी वंचित बहुजन आघाडीची युती सध्या फक्त मुंबई महापालिका निवडणुकीपुरती राहील. तीही अद्याप दृष्टिपथात नाही, असे सोमवारी येथे वंबआचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.
सकल नाभिक समाजाच्या प्रबोधन मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी ते औरंगाबादला आले होते. मेळाव्यापूर्वी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. उद्धव ठाकरे गटाशी केलेली युती फायद्याची राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंबेडकर यांनी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची वंबआची उमेदवारी कालिदास माने यांना जाहीर केली. अन्य मतदारसंघांचेही उमेदवार त्यांनी जाहीर केले. नाशिक पदवीधर मतदारसंघात बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील हा खेळ सुरू आहे. यात विखे यांची कसोटी लागेल. माझ्या मते, विखे पाटील हा भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा राहील. काँग्रेसचा चेहरा बाळासाहेब थोरात राहतील. ग्रामीण मतदान शहराइतके झाल्यास या जागा आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे वा त्यांच्या मंत्र्यांना कामानिमित्त मी भेटलो तरी ती बातमी होत आहे. ‘नोएडाची प्रतिकृती पाहा’ असे शिंदे मला घरी येऊन सांगून गेले. दुसऱ्यांदा मी कामानिमित्त भेटलो, तरी ती बातमी बनली.
उद्धव ठाकरे यांना मी काँग्रेसवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला आहे. एक तर काँग्रेस स्वबळावर लढणार, हे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलायला हरकत नाही, असे ते म्हणाले. ॲड. आंबेडकर यांनी आघाडी करण्यावरून मागच्या वेळी काय काय घडले हे सांगताना पृथ्वीराज चव्हाण हा माणूस ‘खोटारडा नं. एक’ असल्याचा थेट आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी आजोबांचं हिंदुत्व स्वीकारलंय. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व राजकारणासाठी होतं, असेही ते म्हणाले.