परवानगी नसताना दवाखान्यात विकली जात होती ॲलोपॅथी औषधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:05 AM2021-01-08T04:05:16+5:302021-01-08T04:05:16+5:30
औरंगाबाद : अन्न व औषधी प्रशासनाने माळीवाडा येथे मंगळवारी ज्या डॉक्टरवर व त्याच्या दवाखान्यावर कारवाई करीत ॲलोपॅथीचे व गर्भपाताची ...
औरंगाबाद : अन्न व औषधी प्रशासनाने माळीवाडा येथे मंगळवारी ज्या डॉक्टरवर व त्याच्या दवाखान्यावर कारवाई करीत ॲलोपॅथीचे व गर्भपाताची औषधी जप्त केली. तो डॉक्टर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नाही. यामुळे अनधिकृतपणे ॲलोपॅथी औषधी विकत असल्याने कारवाई केली जात आहे. गर्भपाताची औषधी किती महिलांना विकली व ती कोणत्या किमतीत विक्री केली, याची चौकशी केली जात आहे.
माळीवाडा येथील डॉ. दीपक कुंकुलोळ (जैन) हे अनधिकृतरीत्या गर्भपाताची औषधी विकत असल्याच्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने त्या डॉक्टरच्या दवाखान्यावर मंगळवारी छापा टाकला होता. सत्यता पडताळणीसाठी खुद्द औषधी निरीक्षक वर्षा महाजन या डमी रुग्ण म्हणून दवाखान्यात गेल्या होत्या. डॉ. जैन यांनी त्यांना गर्भपाताची औषध दिली. तेव्हा सहायक आयुक्त मिलिंद कोळेश्वरकर व वर्षा महाजन यांनी त्या डॉक्टरवर कारवाई केली. त्याच्या दवाखान्यातील १२ हजार ७३३ रुपयांची ॲलोपॅथी औषधी जप्त करण्यात आली. डॉ. जैन यांनी बीएचएमएस शिक्षण घेतलेले आहे; पण त्यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी केली नाही. म्हणजेच ते नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नाहीत हे सिद्ध झाले. दवाखान्यात सापडलेली ॲलोपॅथी व गर्भपातासाठी लागणारी औषधी विनापरवाना साठवणूक व विक्री करत असल्याने ती औषधी नमुना १६ अंतर्गत जप्त करण्यात आली. डॉ. जैन यांच्याविरुद्ध औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. गर्भपाताकरिता वापरण्यात येणारी औषधी किती महिलांना व किती महागड्या किमतीत विकली जात होती, त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती सहआयुक्त संजय काळे यांनी दिली.