आत्मदहन करण्याची परवानगी द्या; अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी महिलांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2023 06:31 PM2023-05-06T18:31:45+5:302023-05-06T18:32:55+5:30

मागील तीन वर्षांपासून या महिला शेतकरी पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत.  

allow self-immolation; Demand of women farmers waiting for subsidy to Divisional Commissioner | आत्मदहन करण्याची परवानगी द्या; अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी महिलांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

आत्मदहन करण्याची परवानगी द्या; अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी महिलांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

googlenewsNext

फुलंब्री : विहिरीचे काम पूर्ण होऊन चार वर्ष उलटले तरीही अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने तालुक्यातील आडगाव खुर्द येथील दोन महिला शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. 

फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द येथील अपंग व विधवा शेतकरी सखुबाई अंबादास लोणकर व  भागुबाई साहेबराव तुपे या दोन्ही महिलांना सन २०१७ मध्ये पंचायत समितीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाल्या. या विहिरीचे काम २०१९ मध्ये पूर्णही झाले. काम पूर्ण झाल्यास अनुदान मिळाले या आशेवर आर्थिक परिस्थिती बेताची असताना महिला शेतकऱ्यांनी हातउसने करून विहिरीचे काम पूर्ण केले. 

दरम्यान, दोघींनी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे उर्वरित अनुदानाची मागणी केली. मागील तीन वर्षांपासून या महिला शेतकरी पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत.  शेवटी नाईलाजाने ३ मे रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन महिला शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. अनुदानाचे पैसे मिळाले नाही तर ११ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

दोघींची परिस्थिती बेताची 
आडगाव खुर येथील सखुबाई लोणकर व भागुबाई तुपे  महिला शेतकऱ्याना  वैयक्तिक सिंचन विहिरीकरिता ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील १ लाख २० हजार रुपये त्यांना मिळाले. मात्र, आणखी १ लाख ८० हजार रुपये पंचायत समितीकडे बाकी आहेत. महिला शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने उर्वरित रक्कम मिळण्यासाठी धडपडत करीत आहेत.

फुलंब्री पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी नुकताच फुलंब्री पंचायत समिती मधील कारभार चव्हाट्यावर आणला होता आता या कारभारावर आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दोन महिला शेतकऱ्याची गेल्या तीन वर्ष पासून होणारी फरफट हे एक ताजे उदाहरण समोर आले आहे या प्रकारावर राजकीय नेत्यांनी असलेली चुप्पी मात्र शेतकरी वर्गावर अन्याय करणारी आहे या बाबत पावले उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे 

Web Title: allow self-immolation; Demand of women farmers waiting for subsidy to Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.