बारावीनंतर विद्यार्थ्यांना ४३ हजारांचा भत्ता ! पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना माहिती आहे का?
By राम शिनगारे | Published: November 17, 2023 08:20 PM2023-11-17T20:20:31+5:302023-11-17T20:20:42+5:30
काय आहे पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ?
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षांपासून बारावीनंतर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना’ अंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येत आहे.
काय आहे पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ?
आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याबाबत तरतूद केलेली आहे. २ मार्च २०१९च्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजना धनगर समाजासाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
जिल्ह्यांच्या ठिकाणी ४३ हजारांचा भत्ता
भोजन भत्ता २५ हजार : विद्यार्थ्यांना भोजन भत्ता म्हणून वर्षाकाठी २५ हजार रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात दिली जाते.
निवास भत्ता १२ हजार : विद्यार्थ्यांना राहण्यासाठी १२ हजार रुपये प्रतिवर्षी देण्यात येतात.
निर्वाह भत्ता सहा हजार : निर्वाह भत्ता सहा हजार रुपये देण्यात येतो. मात्र, महापालिका किंवा महसुली विभागीय शहरांमध्ये ही रक्कम वाढीव आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
बारावीनंतर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या; परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
कागदपत्रे काय लागणार ?
बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत, एकाचवेळी योजनेचा लाभ घेता येईल. मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला असावा, योजनेंतर्गत लाभासाठी विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती ६० टक्के असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावे.
अर्ज कोठे करायचा ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी व संस्थेने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील.