कोरोनाबरोबरच किराणा, औषधी दुकानेही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:05 AM2021-03-25T04:05:52+5:302021-03-25T04:05:52+5:30
औरंगाबाद : मागील वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, तसेच गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली असताना मागील वर्षभरात शहरात ...
औरंगाबाद : मागील वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, तसेच गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली असताना मागील वर्षभरात शहरात किराणा आणि औषधी दुकानांची संख्या मात्र मोठ्या संख्येने वाढली आहे. वर्षभरात मोठ्या आकाराची जवळपास २२५ नवीन दुकाने, तर ७० मेडिकल स्टोअर्स सुरू झाली आहेत. मागील दोन महिन्यांत ज्वेलर्सच्या दुकानांचीही मोठ्या संख्येने भर पडली आहे.
लॉकडाऊनच्या काळात शहरात फक्त दोन व्यवसाय सुरू होते. ते म्हणजे किराणा व औषधी व्यवसाय. बेरोजगारांनी याच व्यवसायात आपले करिअर करण्याचे ठरविलेले दिसते. शहरात जवळपास २,५०० किराणा दुकाने आहेत. मागील दिवाळीपासून त्यात जवळपास २२५ नवीन किराणा दुकानांची भर पडली असल्याची माहिती जनरल किराणा मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजय कांकरिया यांनी दिली.
कोरोनामुळे औषधी दुकानांचा व्यवसायही तेजीत चालला. लॉकडाऊन असो वा नसो औषधी दुकाने सुरूच असतात. यामुळे फार्मसी झालेल्या युवकांनी आपली औषधी दुकाने सुरू केली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आधी शहरात २,२०० औषधी दुकाने होती त्यात मागील वर्षभरात ७० नवीन औषधी दुकानांची भर पडली. संघटनेचे विनोद लोहाडे यांनी सांगितले की, दरवषी २०० विद्यार्थी फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. मात्र, सर्वच विद्यार्थी व्यवसाय सुरू करत नाही; परंतु गेल्या वर्षभरात स्वतःचा औषधी व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या अधिक होती.
चौकट...
उठाव कमी; पण दुकाने वाढताहेत
सोने-चांदीच्या भावात मागील वर्षभरात अस्थिरता असताना व उठाव कमी असतानाही शहरातील काही भागांत दागिन्यांचे नवीन दालने सुरू झाली आहेत. सुमारे ३० पेक्षा अधिक नवीन दालने उघडली आहेत. यात जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, उस्मानपुरा आदी भागांत ही दुकाने मागील तीन महिन्यांत उघडली आहेत. शहराच्या आसपासच्या गावांतील ज्वेलर्सनी शहरात आपली दालने सुरू केल्याचे सराफा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
चौकट
दुकाने वाढण्याचे कारण
* कोणतीही परिस्थिती असो, किराणा व औषधी दुकान अत्यावश्यक सेवेत येत असल्याने हा व्यवसाय सुरूच राहतो.
* कमी भांडवलमध्ये व्यवसाय सुरू करता येतो.
* छोट्याशा जागेत, घरातही किराणा दुकान सुरू करता येते.
* किराणा दुकान सुरू करण्यासाठी प्रशिक्षणची गरज नसते.
* फार्मसी झाल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा घराजवळच स्वतःचे दुकान सुरू करण्याकडे कल.
* समृद्धी महामार्ग, सोलापूर- धुळे महामार्ग, शेंद्रा- बिडकीन औद्योगिक वसाहतींमध्ये ज्यांच्या जमीन गेल्या त्यांना मोठी रक्कम मिळाली. त्या भागातील सराफा व्यापाऱ्यांनी शहरात दुकाने सुरू केली.