भारीच! दागिन्यांच्या हौसेसोबत सोने-चांदी खरेदीदारांना वर्षभरात २५ टक्के फायदा
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 30, 2024 17:40 IST2024-12-30T17:39:27+5:302024-12-30T17:40:38+5:30
ऑक्टोबर महिन्यात मिळाला मागील ५० वर्षातील विक्रमी भाव

भारीच! दागिन्यांच्या हौसेसोबत सोने-चांदी खरेदीदारांना वर्षभरात २५ टक्के फायदा
छत्रपती संभाजीनगर : प्रत्यक्षात सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांना मागील वर्षात २५ टक्के नफा मिळाला आहे. मागील ५० वर्षांतील भाववाढीचा विक्रम यंदा ऑक्टोबर महिन्यात नोंदविण्यात आला. महिलांची सोन्याच्या दागिन्याची हौसही झाली आणि भाववाढीचा फायदाही मिळाला.
वर्षभरात कसे वाढले भाव
महिना सोने (१० ग्रॅम) चांदी (प्रति किलो)
१ जानेवारी ६३३५३ रुपये--- ७३७०५ रुपये
१ फेब्रुवारी ६२५९९ रुपये---७०८३४ रुपये
१ मार्च ६२८१६ रुपये--- ६९८९८ रुपये
१ एप्रिल ६८६६३ रुपये--- ७५१११ रुपये
२ मे ७१३२७ रुपये---७९७१९ रुपये
३ जून ७१७७६ रुपये---९०२१७ रुपये
१ जुुलै ७१६२६ रुपये---८७८०२ रुपये
१ ऑगस्ट ६९७२१ रुपये---८३४६४ रुपये
२ सप्टेंबर ७१५११ रुपये---८२७८० रुपये
१ ऑक्टोबर ७५५१५ रुपये---८९८८२ रुपये
१ नोव्हेंबर ७८९०० रुपये---९५००० रुपये
२ डिसेंबर ७६३०८ रुपये---८८६११ रुपये
२८ डिसेंबर ७८५०० रुपये---९१००० रुपये
३० ऑक्टोबर ठरला विक्रमी दिवस
सोने व चांदीच्या भाववाढीत ३० ऑक्टोबर २०२४ या दिवशी विक्रम नोंदविण्यात आला. त्या दिवशी सोने ७९५८१ रुपये तर चांदी ९८००० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. मागील ५० वर्षांतील सर्वात उच्चांक ठरला. त्यानंतर शेवटच्या दोन महिन्यात सोन्याच्या किमतीत १०८१ रुपयांची घट झाली तर चांदीच्या किमतीत ७००० रुपयांची घसरण झाली.
ऑक्टोबरमध्ये का झाली मोठी भाववाढ
सोने-चांदीच्या भाववाढीला अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे, रशिया व युक्रेन युद्ध तसेच इस्त्रायल-हमास व लेबनाॅनशी युद्ध आणखी भडकले होते. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत होता आणि त्या काळात भारतात सणासुदीचे दिवस होते. त्यात ऑक्टोबर महिन्यात भारतासह पोलंड, तुर्की, इंडोनेशिया आदी देशांनी सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले. याचा परिपाक म्हणजे सोने-चांदीला विक्रमी किंमत प्राप्त झाली.
वर्षभरात वाढले
वर्षभरात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅमला १५१४७ रुपये व चांदी प्रति किलोमागे १७२९५ रुपयांनी महागली. ज्यांनी जानेवारी २०२४ या महिन्यात सोने व चांदी खरेदी केले त्यांना डिसेंबरपर्यंत २५ टक्के नफा झाला.
नवीन वर्षात सोने ८५ हजारापर्यंत जाईल
आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध आणखी भडकले, तर सोन्याचे भाव नवीन वर्षात ८५ हजार रुपयांपर्यंत तर चांदी १ लाख १५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- नंदकुमार जालनावाला, सराफा व्यापारी