बॅण्डपथकाची पदेही भरा, आमची उंची थोडी कमी, पण पोलीस दलात भरती व्हायचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:17 PM2022-11-15T12:17:35+5:302022-11-15T12:18:07+5:30
आमचे वय सरतेय, संधी द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे
औरंगाबाद : पोलीस व्हायचं ध्येय आहे. उंची २ सेंमी.ने कमी आहे. त्यामुळे बॅण्डपथकातून तरी पोलीस दलात एन्ट्री होईल, असे वाटत होते. म्हणून पाच वर्षांपासून तयारी करतोय. आतापर्यंत एकच भरती झाली. वय सरतेय. या मेगाभरतीत तरी एकही जागा बॅण्डपथकाला नाही. वय निघून गेले तर कसे होईल, असा सवाल पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत.
२०२१-२२ मध्ये निघालेल्या पोलीस भरतीत हजारो पदे भरली जाणार आहेत. मात्र, आम्ही बॅण्ड पथकासाठी शहरात राहून तयारी केली. त्या पदाच्या एकही जागा भरल्या जाणार नसल्याने भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या परिस्थितीचा आणि बॅण्ड पथकातील रिक्त जागांचा विचार सहानुभूतीने करा आणि आम्हाला भरतीची संधी उपलब्ध करून द्या, म्हणून पोलीस बॅण्ड भरतीची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, विरोधी पक्षनेते, मंत्र्यांनाही निवेदने दिली. आता गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी विद्यार्थी मुंबईला रवाना होत आहेत. मागणी एकच आहे. अडीच सेंटिमीटर उंचीत सूट देणाऱ्या पोलीस बॅण्डच्या पदांची भरती करा आणि कमी उंचीच्या विद्यार्थ्यांनाही रोजगाराची संधी द्या. शरद घोरपडे, अदिल शेख, भास्कर शेवाळे, राहुल वाघ, आनंद दाभाडे हे वेगवेगळ्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसह भाग्यश्री नरवडे, रंजना तायडे, सरिता सरदार, मानसी अन्नपुरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना निवेदने देत मागणी केली आहे.
आता तरी पदे भरा
पाच वर्षांपासून बॅण्डभरतीची तयारी करतोय. माझी उंची दोन सेंमीने कमी असल्याने हाच एकमेव पर्याय आहे. पाच वर्षांत एकच भरती झाली. त्यातही दोनच पदे होती. त्यामुळे स्वप्न पूर्ण झाले नाही. तयारीला दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतोय. वय सरत आहे. शेवटची २ वर्षे शिल्लक राहिली. आता तरी पदे भरा, हीच शासनाकडे मागणी आहे. हे राज्यव्यापी आंदोलन आहे.
-शरद घोरपडे, भरती तयारी करणारा विद्यार्थी