देशाची गुपिते विकणाऱ्या कुरुलकर विरोधातही मोर्चे काढा; 'औरंगजेबा'वरून राऊतांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:11 PM2023-06-07T13:11:47+5:302023-06-07T13:13:42+5:30
''कुरुलकरने पाकिस्तानला भारताची गुपित विकली. हा प्रकारही औरंगजेबा इतकाच गंभीर आहे.''
छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहात. कुरुलकरने पाकिस्तानला भारताची गुपित विकली. हा प्रकारही औरंगजेबा इतकाच गंभीर आहे. त्यावरही आंदोलने करायला हवी होती, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. कोल्हापुरात हिंदू संघटनांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला. औरंगजेबाचे फोटो झळकत असतील तर हे शिंदे- फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका राऊत यांनी केली. ते पुढे म्हणले, पुण्यातील ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. कुरुलकर ज्याने पाकिस्तानला भारताची गुपितं विकली. तो आरएसएसचा प्रमुख कार्यकर्ता होता. त्याच्या विरोधातही मोर्चा काढायला हवा होता. औरंगजेबा इतकाच हा विषय गंभीर आहे. संघाचे काही लोकं पाकिस्तानशी हातमिळवणी करतात. देशाची गुपिते विकली जातात. हनी ट्रॅपमध्ये सापडले जातात. हा विषय कोल्हापूर, नगरमध्ये औरंजेबाचा स्टेट्स ठेवण्या एवढाच गंभीर आहे. गुन्हेगारांवर कठोर टीका केली पाहिजे, राज्यात शांतता राहावी, सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळावा, अशी आमची मागणी असल्याचे राऊत म्हणाले.
राज्यातील काही भागात दंगलसदृश्य परिस्थिती आहे. अशी स्थिती आताचा का निर्माण झाली ? कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हा तणाव कोण निर्माण करत आहे. कोल्हापुरात काही तरुणांचा स्टेट्स वादग्रस्त होता. त्यातून तणाव निर्माण झाला आहे. ज्यांनी स्टेट्स ठेवला असेल त्यांच्यावर कारवाई करा. ती हिंमत दाखवा, असे आव्हान राऊत यांनी दिले. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात दंगली होत आहेत. यामागे कुणाचं षडयंत्र आहे? कुणाला एवढीच हिंदुत्वाची ऊर्मी आली असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. पाकिस्तानला गुपितं विकणारे संरक्षणखात्यातील लोकं पुण्यात सापडली. त्यांच्याविरोधात या संघटनांना उत्तेजन का दिलं नाही? ते का रस्त्यावर उतरले नाही?, असा सवाल राऊत यांनी केला.