मृत्यूचा हाही आकडा पहा सरकार, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

By संतोष हिरेमठ | Published: October 3, 2023 02:06 PM2023-10-03T14:06:26+5:302023-10-03T14:09:44+5:30

घाटी रुग्णालयही व्हेंटिलेटरवर : १५ दिवसांचाच औषधसाठा, औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन नातेवाईकांची भटकंती

Also see death toll Govt, 14 deaths in 24 hours at Ghati Hospital, Chhatrapati Sambhajinagar | मृत्यूचा हाही आकडा पहा सरकार, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

मृत्यूचा हाही आकडा पहा सरकार, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय घाटी रुग्णालयाला कायम औषधटंचाईला तोंड द्यावे लागते. सोमवारीही येथे केवळ १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा होता. शिवाय हातात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन भटकणारे नातेवाईकही येथे पाहायला मिळाले.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश होता. त्यामुळे नांदेडात एकच खळबळ उडाली आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे न मिळाल्याने जीव गमवावा लागण्याची वेळ येत असल्याची भीती व्यक्त होत आहे. घाटी रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत मिळणारा निधी अपुरा पडतो. औषध पुरवठाही अपुरा पडतो. त्यामुळेच घाटीत कायम औषधटंचाई पाहायला मिळते. त्यामुळे घाटी परिसरात औषध दुकानांची संख्या वाढतच आहे.

बहुतेक रुग्ण बाहेरून रेफर झालेले
औषधी तुटडा किंवा डॉक्टरच्या कमतरतेने, हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झालेले नाहीत. यातील बहुतेक रुग्ण हे बाहेरून रेफर केलेले होते किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते, अशी माहिती डीन संजय राठोड यांनी दिली.

घाटीला किती प्रकारची लागतात औषधे?
घाटी रुग्णालयाला तब्बल १२० प्रकारची औषधे लागतात. यातील अनेक औषधांचा आजघडीला ठणठणाट आहे. त्यामुळे अशा औषधांची नातेवाईकांच्या हातात चिठ्ठी देऊन बाहेरून आणण्यास सांगितले जाते. योजनेच्या माध्यमातून औषधे उपलब्ध करून दिली जातात, तसेच गरजूंसाठी लोकल पर्चेसही केले जाते, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

कोणकोणत्या औषधांचा ठणठणाट?
घाटीत आजघडीला रेबिज लस, अँटिबायोटिक्स, सलाइनसह विविध प्रकारची औषधे उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- घाटी रुग्णालयातील एकूण खाटा - १,१७७
- प्रत्यक्ष भरती राहणारे रुग्ण - १५०० ते १७००
- दररोज होणाऱ्या प्रसुती - ५० ते ७०
- रोजची ओपीडी - १५०० ते २ हजार
- रोजची आयपीडी - १५० ते २००

Web Title: Also see death toll Govt, 14 deaths in 24 hours at Ghati Hospital, Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.