आपला हिस्सा विकून बहिणीच्या शेतीवरही ताबा; वादातून भावांकडून बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 05:35 PM2024-05-29T17:35:15+5:302024-05-29T17:35:36+5:30

शेतात पाय ठेवला तर मारून टाकण्याची धमकी दोन्ही भावांनी बहिणीला दिली आहे

Also take control of sister's farm by selling her share; Brothers beat sister with ax due to argument | आपला हिस्सा विकून बहिणीच्या शेतीवरही ताबा; वादातून भावांकडून बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण

आपला हिस्सा विकून बहिणीच्या शेतीवरही ताबा; वादातून भावांकडून बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण

लिंबेजळगाव : शेतीच्या वादातून दोन भावांनी सख्या बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांनी सोबत आणलेल्या रिक्षाचीही तोडफोड केली. ही घटना लिंबेजळगांव येथे शनिवारी (दि. २५) घडली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताराबाई बडख (वय ३७, रा. कमळापूर) असे मारहाण झालेल्या बहिणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबेजळगाव येथे ताराबाई बडख यांच्या आई सुमनबाई मनाळ यांच्या नावावर गट नं. १७२ मध्ये ३ एकर शेती होती. यातील २ एकर शेती ताराबाई यांचे भाऊ रामू मनाळ व आकाश मनाळ यांनी विक्री केली आहे. उरलेली एक एकर जमीन १२ जानेवारी २०२४ रोजी ताराबाई यांच्या नावावर खरेदी खताद्वारे करण्यात आली आहे. ही जमीन रामू व आकाश हे दोघे कसत होते. दरम्यान, शनिवारी (दि. २५) ताराबाई बडख या तीन महिला मजुरांना सोबत घेऊन कमळापूर येथून लिंबेजळगाव येथे रिक्षाने (एमएच २०-ईके २८१५) शेतात पोल लावण्यासाठी आल्या. 

यावेळी रामू व आकाश यांनी कुटुंबासह येऊन ताराबाई व त्यांच्यासोबत आलेल्या महिला मजूर व रिक्षा चालकावर हल्ला केला. यावेळी अर्चना मनाळ हिने हातातील कुऱ्हाड ताराबाईच्या पायावर मारून जखमी केले, तर रामूने रिक्षा चालकाला लाकडी दांड्याने मारहाण करून रिक्षाची तोडफोड केली. तसेच महिला मजुरांच्या पाठीमागे कोयता घेऊन धावल्याने त्या पळून गेल्या. ताराबाई यांना आरोपींनी शेतात पाय ठेवला तर मारून टाकण्याची धमकी दिली.

याप्रकरणी ताराबाई बडक यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलिसांनी रामू मनाळ, आकाश मनाळ, अर्चना मनाळ यांच्याविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि सखाराम दिलवाले करीत आहेत.

Web Title: Also take control of sister's farm by selling her share; Brothers beat sister with ax due to argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.