कंत्राटदार बदलले तरीही 'औरंगाबाद-जळगाव' रस्त्याचे काम अद्याप ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 07:43 PM2019-10-10T19:43:27+5:302019-10-10T19:50:21+5:30

पाठपुरावा करणाऱ्या अभियंत्यांच्या टीमची बदली

Although the contractor has changed, the work on the 'Aurangabad-Jalgaon' road is still stopped | कंत्राटदार बदलले तरीही 'औरंगाबाद-जळगाव' रस्त्याचे काम अद्याप ठप्प 

कंत्राटदार बदलले तरीही 'औरंगाबाद-जळगाव' रस्त्याचे काम अद्याप ठप्प 

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण होण्यासाठी अजून दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लेणीप्रेमी पर्यटकांना दीड वर्ष लांब पल्ल्यावरून प्रवास करीत लेण्यांकडे जाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

अवसायनात निघालेल्या आंध्र प्रदेशाच्या ऋत्विक एजन्सी या कंत्राटदार कंपनीने नॅशनल हायवे विभागाला हात दिल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असून, सर्व स्तरातून ओरड सुरू झाल्यानंतर विभागाने तीन कंत्राटदार या कामासाठी नेमले आहेत. रस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही. कामाची एवढी संथगती असताना प्रशासकीय यंत्रणेला मुंबईतील मुख्यालयाला  आदेशाविना काहीही करता आले नाही. परिणामी पर्यटक, नागरिक, प्रशासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांसह एस. टी. महामंडळाला त्या रस्त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. आणखी दीड वर्ष रस्त्याचे काम पूर्ण होणार नसल्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना व अपघाताना कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न आहे. ऋत्विक एजन्सीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. त्याचा परिणाम या कामावर झाल्यामुळे कंत्राटदार कंपनीने 
साहित्य सोडून येथून काढता पाय घेतला. 
अधीक्षक अभियंत्यांची बदली 
दोन महिन्यांत रस्त्याची परिस्थिती चांगली होईल, असा दावा करणारे नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता एल. एस. जोशी यांची बदली मुंबईला झाली . एकतर्फी रस्ता सध्या सुरू आहे. बीटी व काँक्रीटचे काम सुरू आहे. १ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. १५ ते १८ महिने तरी काम होण्यासाठी लागतील. रावसाहेब चव्हाण आणि कामटे व अन्य एक, अशा तीन कंत्राटदारांकडे काम आहे. ८० टक्के काम बाकी आहे. कंत्राटदार बदलल्यामुळे एका महिन्यात चांगले परिणाम येण्याची शक्यता असतानाच अधीक्षक अभियंता जोशी, उपअभियंता खडलसे यांची बदली झाली आहे. या कामासाठी पाठपुरावा करणारी अधिकाऱ्यांची टीमच 
बदलून गेल्यामुळे काम आता रामभरोसे आहे.

सव्वावर्षात फक्त २० टक्केच काम
पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी, अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली होती. पूर्वी ३०० कोटींच्या आसपास कंत्राट होते. त्यात ७०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद केली. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता काँक्रिटीकरणातून करण्याचे नियोजन आहे. ऋत्विक एजन्सीला २० टक्के कामाचा मोबदला मोठ्या प्रमाणात दिला, परंतु तो कंत्राटदार काम करीत नसल्यामुळे त्याच्या जागी दुसरे कंत्राटदार नेमले.

Web Title: Although the contractor has changed, the work on the 'Aurangabad-Jalgaon' road is still stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.