आला आमरसाचा हंगाम; औरंगाबाद बाजरपेठेत लालबाग, हापूस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 04:41 PM2019-03-14T16:41:07+5:302019-03-14T16:43:30+5:30
फळांच्या राजाचे बाजारात आगमन
औरंगाबाद : खवय्यांना मोहित करणारा फळांचा राजा आंबाबाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र, खिशाला न परवडणाऱ्या किमतीमुळे अजून सर्वसामान्य ग्राहक आंबा हातात घेण्यास तयार नाहीत.
उन्हाचा पारा चढत असताना बाजारात हंगामी फळ आंबा विक्रीला आला आहे. बंगलोरहून लालबाग आला आहे. १५० ते १८० रुपये किलोने हा आंबा विकल्या जात आहे. शहरातील मोजक्याच विक्रेत्यांकडे हा आंबा उपलब्ध आहे. हापूस आंबाही आला असून, रत्नागिरीचा हापूस म्हणून तो विकण्यात येत आहे. चक्क १००० ते १२०० रुपये डझन या भावात हापूस विकल्या जात आहे. नवाबपुरा परिसरातील फळांचे विक्रेते शेख खलील यांनी सांगितले की, सध्या चढ्याभावामुळे दररोज २५ ते ३० किलोच आंबे विकल्या जात आहेत.
मुंबई, पुणे येथे नंबर १ दर्जाचे आंबे विकल्या जातात. औरंगाबादेत चौथ्या, पाचव्या दर्जाचे आंबे विक्रीला येतात. मराठवाड्यातील नंबर १ दर्जाचा केशरही शहरात विक्रीला येत नाही. मुंबई, पुणे आदी महानगरात या आंब्यांना जास्त भाव मिळतो, असेही विक्रेत्यांनी सांगितले. रत्नागिरीचा नंबर एक हापूस फेब्रुवारीपासूनच मुंबई, पुणे बाजारात विक्रीला येत आहे. आपल्याकडे येत असलेला हापूस हा चौथ्या व पाचव्या दर्जाचा असून, मागील १० दिवसांपासून उपलब्ध होऊ लागला आहे. आता येत्या १५ ते २० दिवसांनी आंध्र प्रदेशातील बदाम व एप्रिल महिन्यात गुजरातमधील केशर आंबा विक्रीला येईल.
अक्षय तृतीयेपासून वाढते आंब्याला मागणी
मे महिन्यापासून बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होईल. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, आजही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय तृतीयापासूनच आंबे खाण्यास सुरुवात करतात. यंदा अक्षय तृतीया ७ मे रोजी येत आहे. त्यानंतरच आंब्याची विक्री वाढेल.