अधिसभा निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडीतून तयार झाले 'अंबड- परळी' कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 08:29 PM2017-11-06T20:29:18+5:302017-11-06T20:34:26+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत उमेद्वारी मागे घेण्याच्या शेवटी दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत उमेद्वारी मागे घेण्याच्या शेवटी दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीसाठी ‘अभाविप’प्रणित विद्यापीठ विकास मंचने, तर राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ महाविद्यायाच्या प्राचार्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित उत्कर्ष पॅनेलने उमेदवार मागे घेतले. बिनविरोध निवडूण दिले. एकुण सहा उमेदवार बिनविरोध आले आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक आणि विद्यापरिषदेच्या गटात उमेदवारी मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक नाट्यमड घडामोडी घडल्या. संस्थाचालक गटात माजी उच्चशिक्षणमंत्री आमदार राजेश टोपे यांच्या पत्नी मनिषा टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित उत्कर्श पॅनलतर्फे नामांकन दाखल केले होते. त्यांच्याविरोधात ‘अभाविप’प्रणित विद्यापीठ विकास मंचतर्फे डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी नामांकन दाखले केले. डॉ. भारस्वाडकर यांनी नामांकन मागे घेण्यासाठी शेवटच्या क्षणी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या. शेवटच्या क्षणाला मनिषा टोपे बिनविरोध निवडूण येत नसतील तर त्यांची उमेद्वारीच मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र राजेश टोपे यांनी थेट राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधत दोन्ही गटाचा एक-एक उमेदवार निवडूण आणण्यावर एकमत केले.
या एकमताला आमदार सतीश चव्हाण यांनी ऐनवेळी साथ दिल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक प्राचार्य डॉ. रामचंद्र इप्पर यांच्या विरोधातील बीडच्या बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव सानप यांनी प्राचार्याच्या गटात एनटीमधून दाखल केलेले नामांकन मागे घेतले. तर मनिषा टोपे यांच्यासाठी डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी नामांकन मागे घेतले. यामुळे राजेश टोपे आणि पंकजा मुंडे यांच्या जवळचे दोन्ही उमेद्वरांचा संबंधित गटात एकमेव अर्ज राहिल्यामुळे बिनविरोध निवडूण आले आहेत. याशिवाय उत्कर्ष पॅनलचे संस्थाचालक गटात राहुल म्हस्के, प्राचार्य गटात डॉ. शिवदास शिरसाठ, डॉ. तृप्ती देशमुख बिनविरोध आले. तर डॉ. रमेश मंझा हे सूद्धा बिनविरोध आले आहेत. मात्र त्यांच्यावर उत्कर्ष आणि विद्यापीठ विकास मंचतर्फे दावा केला आहे. मात्र डॉ. मंझा यांनी आ. सतीश चव्हाण यांची भेट घेत उत्कर्ष पॅनलचा असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती डॉ. राजेश करपे यांनी दिली.
‘बामुक्टो’चा स्वतंत्र पॅनल कायम
अधिसभा निवडणूकीत शिक्षक गटात बामुक्टो या संघटनेतर्फे स्वतंत्र उमेदवार देण्यात आले आहेत. या उमेदवारांवर नामांकन मागे घेण्यासाठी विविध प्रलोभने दाखविण्यात आली होती. मात्र कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता बामुक्टोतर्फे शिक्षक गटातील आठ जागा लढविण्यात येत आहेत. या आठ उमेद्वारांसाठी संघटना ताकदीनिशी प्रचारात उतरणार असल्याची माहिती डॉ. विक्रम खिलारे यांनी दिली.
ये अंदर की बात है, जालना हमारे साथ है
अंबड आणि परळीची सेंटीग झाल्यानंतर विद्यापीठ विकास मंचतर्फे प्रशासकीय इमारतीसमोर डॉ.रामचंद्र इप्पर यांच्या बिनविरोध निवडीबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. ‘ये अंदर की बात है, जालना हमारे साथ है’ अशा आशयांच्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री राजेश टोपे यांचा विद्यापीठ विकास मंचला आतुन पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. या घोषणाबाजीत मंचचे निमंत्रक डॉ.गजानन सानप, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. भगवानसिंग डोभाळ यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
...तर माघार घेणार होते
माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पत्नी थेट निवडणूक लढविण्यास तयार नव्हत्या. एकतर बिनविरोध किंवा माघार... हेच पर्याय समोर ठेवले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांच्या पत्नी अधिसभेवर बिनविरोध निवडून येतात. तर औरंगाबादेत माजी मंत्री टोपे यांच्या पत्नी का बिनविरोध निवडून येत नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यासाठी विद्यमान मंत्री पंकजा मुंडे मदतीला धावून आल्या. उत्कर्ष पॅनलनेही केवळ बिनविरोधसाठी एक जागा सोडून दिली अन् दोन्ही गटाचे एक-एक उमेदवार बिनविरोध काढले.