'पक्षात सर्व अंबादास दानवेंनाच मिळते'; औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:59 PM2022-08-19T13:59:40+5:302022-08-19T14:01:40+5:30
अजून किती दिवस अन्याय सहन करायचा, असा सवाल करत त्रिवेदी यांनी शिवसेना सोडली
औरंगाबाद :शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, कृउबा सभापती चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
जिल्हाप्रमुख पद पूर्ण क्षमतेने मिळाले नाही. पक्षात सगळे काही आ.अंबादास दानवे यांनाच दिले जात आहे. अजून किती दिवस अन्याय सहन करायचा, असा सवाल करत त्रिवेदी यांनी शिवसेना सोडल्याचे कारण ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ठोंबरे, जाधव हे देखील शिंदे गटात सामील झाल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात त्रिवेदी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी एका कामानिमित्त भेटल्याचे सांगितले होते, परंतु त्याच दिवशी त्यांचे शिंदे गटात जाण्याचे नक्की केले होते, हे गुरुवारी स्पष्ट केले. यावेळी रोहयो मंत्री संदीपपान भुमरे, आ. संजय शिरसाट, माजी मंत्री अर्जुन खोतकर आदींची उपस्थिती होती. त्रिवेदी यांच्याकडे पैठण, फुलंब्री, सिल्लोड या मतदारसंघात संघटन करण्याची जबाबदारी होती.
यापैकी सिल्लोड व पैठण मतदारसंघातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री भुमरे हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शहरातील १० वॉर्ड त्रिवेदी यांच्या मतदारसंघात होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचे काय नुकसान होते, हे आगामी काळात कळेल.