खैरे- दानवेंमध्ये समेट; अंबादास दानवेंच्या व्हॅनिटी व्हॅनचे चंद्रकांत खैरेंच्या हस्ते पूजन
By बापू सोळुंके | Published: December 29, 2023 08:00 PM2023-12-29T20:00:19+5:302023-12-29T20:01:14+5:30
पक्षाकडून अद्याप लोकसभेचा उमेदवार कोण असेल, याविषयी स्पष्ट नाही.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर शुक्रवारी या नेत्यांमध्ये समेट झाल्याचे दिसले. दानवे यांनी खरेदी केलेल्या व्हॅनिटी व्हॅनचे पूजन शुक्रवारी खैरे यांच्या हस्ते करून आपल्यात कोणतेच मतभेद नसल्याचे या नेत्यांनी दाखवून दिले.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर सलग चार वेळा खासदार म्हणून खैरे हे निवडून गेले होते. गत निवडणुकीत एमआयएमकडून त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतरही खैरे यांनी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण जिंकू, असा दावा करीत काम सुरू केले होते. पक्षाकडून अद्याप लोकसभेचा उमेदवार कोण असेल, याविषयी स्पष्ट नाही. असे असताना आ. दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवीन, असे सांगितले होते.
यानंतर दानवे आणि खैरे यांच्यात ‘तू,तू, मै मै’ झाली’. याविषयीच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी या दोन्ही नेत्यांना न बोलावता मतदारसंघातील इतर प्रमुख २५ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर दानवेंनी खैरे हे आमचे नेते आहेत, पक्षांतर्गत थोडीफार तडतड होत असते, आमच्यात काही मतभेद नाही, असा खुलासा केला होता. शुक्रवारी त्यांनी विकत घेतलेल्या व्हॅनिटी व्हॅनचे पूजन खैरे यांच्या हस्ते करून घेतले. यामुळे आता उभय नेत्यांत पक्षप्रमुखांच्या आदेशाने समेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.