दानवे माझे शिष्य... तेच मला भेटायला येतील, कारण...; तिकीट जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:20 PM2024-03-27T13:20:41+5:302024-03-27T13:23:47+5:30
खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले...
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाल्यानंतर, सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. पक्षांकडून आपापले उमेदवारही जाहीर करण्यात येत आहेत. यातच, महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी कुणाला उमेदवारी दिली जाते? चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेचे हे दोन नेते उत्सुक होते. शर्यतीत होते. मात्र अखेर आज ठाकरे गटाने 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले. यात चंद्रकांत खैरे यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) सलग सहाव्यांदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर आता खैरे यांची प्रतिक्रियाही आली आहे.
दानवे माझे शिष्य... -
यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले, दानवेच मला भेटायला येतील, कारण आता सर्व येतील त्याप्रमाणे तेही येतील. आम्ही सर्वजण एकमेकांना भेटत असतो. शिवसेनेत तेवढ्यापुरतीच स्पर्धा असते. एकदा तिकीट मिळाल्यानंतर आम्ही काही बोलत नाही." खैरे एबीपी माझ्यासोबत बोलत होते.
"कुणीही येऊदेत हो, उद्धव ठाकरे जिंदाबाद..." -
यावेळी प्रतिस्पर्धक कोण? कारण यावेळी भाजप सोबत नसणार, यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "भजप सोबत नसले म्हणून काय झाले? महाविकास आघाडी असेलना. काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि आम्ही, आम्ही सर्व एकत्र आहोत. तसेच, प्रतिस्पर्धक कोण महायुती की एमआयएम? यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, कुणीही येऊदेत हो, उद्धव ठाकरे जिंदाबाद." याच वेळी, "मी विशेष म्हणजे, भद्रामारुतीचे आभार मानेल, भद्रामोरुतीचं दर्शन माननीय उद्धवजींनी केलं आणि माझं काम झालं," असेही खेरे म्हणाले.