अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा
By बापू सोळुंके | Published: March 31, 2024 05:31 PM2024-03-31T17:31:20+5:302024-03-31T17:31:58+5:30
'चंद्रकांत खैरेंना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार.'
छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrkant Khaire) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील वादावर रविवारी अखेर पडदा पडला. रविवारी सकाळी आ. दानवे यांनी खैरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर खैरे यांना पेढा भरवला आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या. खैरे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यात काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळण्यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू होते. प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनाला खैरे यांनी दानवे यांना बोलावले नव्हते. तेव्हा खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात, अशी नाराजी आ. दानवे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आपणही पक्षाकडे लोकसभेचे उमेदवारी मागितल्याचे पत्रकारांना सांगितले होते. उमेदवारी मिळावी, यासाठी दानवे यांनी दबावतंत्राचा वापरही केला होता. यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.
चार दिवसांपूर्वी पक्षाने खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतरही आ. दानवे यांनी खैरे यांचा नाही तर पक्षाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, शनिवारी पक्षप्रमुखांच्या आदेशाने दोन्ही नेत्यांची मुंबईत दिलजमाई झाली. रविवारी सकाळी आ. दानवे हे पुष्पगुच्छ, शाल आणि मिठाईचा बॉक्स घेऊन चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी खैरे यांना पेढा भरवला आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सचीव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य आदींची उपस्थिती होती.
खैरे यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार
यावेळी पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, उमेदवारी मिळेपर्यंत आमच्यामध्ये स्पर्धा आणि नाराजी होती, आता ही नाराजी संपली आहे. मी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता आणि छत्रपती संभाजीनगरचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. यामुळे खैरे यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.
महायुतीकडे चार ताकदवान माणसंही नाहीत
खैरे म्हणाले, आम्ही दोघे नेहमीच एकत्र असतो. अनेक निवडणुका चांगली प्लॅनिंग करून जिंकल्या आहेत. आता ही निवडणूकही जिंकू. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडे चार चांगली माणसेही नाहीत म्हणूनच त्यांना बाहेरून उमेदवार शोधावा लागतो अशी टीका त्यांनी केली.