बीएचआर घोटाळा प्रकरणात आदर्श ग्रुपचे अंबादास मानकापे पुणे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 03:25 PM2021-06-18T15:25:01+5:302021-06-18T15:28:16+5:30
‘बीएचआर’मधील फसवणूक आणि कोट्यवधींच्या अपहार प्रकरणाचा तपास पुणे आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
औरंगाबाद : शहरातील आदर्श ग्रुपचे संस्थापक अंबादास आबाजी मानकापे यांना भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (बीएचआर) कथित गैरव्यवहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता शहरातील त्यांच्या घरातून अटक केली. या अटकेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.
‘बीएचआर’मधील फसवणूक आणि कोट्यवधींच्या अपहार प्रकरणाचा तपास पुणे आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सकाळी औरंगाबादसह जळगाव, जामनेर, अकोला, आणि पुणे शहरात छापेमारी केली. या घोटाळ्याशी संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली. पुणे आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक वावरे यांचे पथक आज सकाळी औरंगाबादेत दाखल झाले. सिडको ठाण्यातील हवालदार काळे, महिला हवालदार मुखाडे यांना सोबत घेऊन पथकाने मानकापे यांच्या घरावर धाड टाकली. या वेळी मानकापे यांना ‘चौकशीसाठी आमच्या सोबत पोलीस ठाण्यात चला,’ असे सांगून अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. यानंतर अधिकारी त्यांना सिडको ठाण्यात घेऊन गेले. तेथे त्यांच्या अटकेची नोंद करून पोलीस त्यांना पुण्याला घेऊन गेले. मानकापे यांना बीएचआर घोटाळा प्रकरणात अटक केल्याच्या बातमीने शहरात चर्चा सुरू झाली.
सहकार क्षेत्रात खळबळ
मानकापे यांनी सहकाराच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभे केले आहे. विविध संस्थांचे ते संस्थापक आहेत. आदर्श महिला नागरी सहकारी बँक, आदर्श पतसंस्था शिवाय आदर्श दूध डेअरी, आदर्श इंग्लिश स्कूल, आदर्श रुग्णालय तसेच एका वर्तमानपत्राचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या अटकेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.