अंबाजोगाई बाजार समितीवर बरखास्तीची टांगती तलवार ?
By Admin | Published: May 28, 2014 11:44 PM2014-05-28T23:44:54+5:302014-05-29T00:36:31+5:30
अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई शेतीमाल खरेदी विक्रीशिवाय कुठलाही व्यवसाय करता येत नसताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्लॉटमध्ये विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत.
अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई शेतीमाल खरेदी विक्रीशिवाय कुठलाही व्यवसाय करता येत नसताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्लॉटमध्ये रॉकेल विक्री, बँका, पतसंस्था, प्रिटींग प्रेस, खताचे दुकाने व विविध व्यवसाय करणारी दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत. एवढ्यावरच नाही तर बाजार समितीच्या जागेत विंधन विहीर घेऊन त्या विहिरीचे पाणीही विकले जाते. हा सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरू आहे. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी सादर झालेल्या अहवालाची दखल घेत या प्रकरणाचा ९ जूनपर्यंत खुलासा न केल्यास बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची नोटीस बजावली आहे. बाजार समितीच्या हिताचे निर्णय संचालक मंडळाने न घेतल्याचा ठपकाही संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे एकूण २०५ प्लॉट शेतीमाल खरेदी व विक्रीसाठी पाडण्यात आले. या २०५ पैकी १३७ प्लॉटवर पोटभाडेकरू आहेत. ज्या व्यक्तीच्या नावे प्लॉट दिला आहे. त्याच व्यक्तीला शेतीमालाची खरेदी व विक्री करण्यासाठीच या जागेचा वापर करता येतो. मात्र, बाजार समिती प्लॉट धारकाने व्यावसायिक गाळे बांधून आहेत तेवढे उद्योगधंदे करण्याला परवानगी दिली आहे आणि हा सर्व प्रकार बिनधास्तपणे गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे सुरूच आहे. हॉटेल, बांधकाम साहित्याचे दुकाने, किराणा दुकान, डाळ मिल, आॅईल मिल, प्रिंटिंग प्रेस, रंगाची दुकाने, तेलाची दुकाने, बँका, पतसंस्था, रॉकेल विक्री दुकाने, रस्सी विक्री, खताची दुकाने, मशीनरीची दुकाने, या शिवाय अनेकांचे तर ‘आगे दुकान पिछे मकान’ अशी घरेही बांधण्यात आली आहेत. काही जणांनी तर आपला रॉकेलचा व्यवसायच या ठिकाणी सुरू केला आहे. या सर्व स्थितीवर येथील व्यापारी प्रकाश विठ्ठल आपेट यांनी आक्षेप नोंदविला. जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणाची चौकशी करून प्लॉटधारकांना नोटिसाही बजावल्या. या प्लॉटधारकांना खुलासा करण्याबाबत पत्र देण्यात आले. यात शहरातील अनेक राजकीय पुढारी, कार्यकर्ते, व्यापारी यांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी येथील सहायक निबंधक कार्यालयातील शिवराज नेहरकर यांची नियुक्ती करून बाजार समितीतील प्लॉटची पाहणी केली व याचा अहवाल नेहरकर यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. या अहवालाची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या संचालक मंडळास महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५ (१) अन्वये बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावत नऊ जूनपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश संचालक मंडळाने बजावले आहेत. बाजार समितीच्या सर्व संचालकांना या नोटिसा दिल्या असल्याची माहिती अंबाजोगाई येथील सहायक निबंधक व्ही. एल. पोतंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा शेतकर्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी केवळ भूखंड लाटण्याकडेच लक्ष असलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे. बाजार समितीत कोणत्या प्लॉटमध्ये कोण भाडेकरू व कोण पोटभाडेकरू याचा अहवाल सहकार खात्याने करायला सांगितला होता. याची दखल घेण्यात आली असून त्या अहवालाप्रमाणे संचालक मंडळावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहकार खात्याला अहवाल प्राप्त झाला असल्याने त्यांनी थेट संचालक मंडळाच्या बरखास्तीची कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली. बाजार तळाच्या जागेवरही पाडले ७४ प्लॉट बाजार समितीच्या संचालक मंडळाने आठ वर्षांपूर्वी एकत्रित येऊन ज्या ठिकाणी दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. त्या बाजार तळावर व आजूबाजूला ७४ प्लॉट पाडले व या प्लॉटच्या विक्रीचाही घाट घातला. मात्र, शहरवासियांनी या प्रश्नी मोठे जनआंदोलन उभारले व हे प्लॉट रद्द केले. या प्लॉटच्या व्यवहारात आजही अनेक व्यापार्यांच्या मोठमोठ्या रकमा अडकून पडल्याचे बोललेले जाते. हे ७५ प्लॉट कसे पाडता येतील याची खटपट अजूनही बाजार समितीच्या संचालकांमध्ये सुरूच आहे. या संदर्भात बाजार समितीचे सचिव दिलीप लोमटे यांच्याकडे विचारणा केली असता वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे जो आदेश येईल त्याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला असल्याची बाजार समितीचे सचिव दिलीप लोमटे म्हणाले. आपण सारे भाऊ-भाऊ, बाजार समिती मिळून खाऊ आपण सारे भाऊ भाऊ बाजार समिती मिळून खाऊ अशी स्थिती अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. चार वर्षांपूर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुकीसाठी सर्व विरोधक गटतट विसरून एकत्रित आले व महायुती केली. या महायुतीत गोपीनाथ मुंडे, अक्षय मुंदडा, अॅड. आनंदराव चव्हाण, रमेशराव आडसकर, अशोकराव देशमुख, हे सर्व जण एकत्रित आले व बाजार समिती ताब्यात घेतली. अडीच वर्षे मुंदडांकडे तर आता उर्वरित अडीच वर्षे भाजपचे दत्तात्रय पाटील सभापती आहेत. सर्व विरोधकच एकत्रित येऊन बाजार समितीत सामील झाल्याने सामान्य शेतकर्याने दाद तरी कुठे मागायची असा प्रश्न उभा राहिला आहे.