'अभाविप'वर कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांचे विद्यापीठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 05:03 PM2018-09-25T17:03:12+5:302018-09-25T17:05:45+5:30
अभाविपचे आंदोलन असंवैधानिक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत आज आंबेडकरी संघटनांनी विद्यापीठ बंद केले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू दालनात 'अभाविप'च्या ठिय्या आंदोलनावरून सोमवारी सायंकाळी तणाव निर्माण झाला होता. अभाविपचे आंदोलन असंवैधानिक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत आज आंबेडकरी संघटनांनी विद्यापीठ बंद केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे वसतिगृहात अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी कुलगुरूंच्या सोमवारी सायंकाळी दालनात ठिय्या देत आंदोलन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांच्या अंडरवेअर, कपडे, बकेट, मग, कंगवा, आरसा, टॉवेल, बटाटे, चिवडा, साबण अशा सर्व वस्तू आणून दालनातच संसार मांडला. नाश्ता, झोपणे अशा पद्धतीने आंदोलन सुरू असतानाच या आंदोलनावर आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत दालनातील वस्तू फेकून दिल्या. यावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. आंबेडकरी विद्यार्थी संघटनां आणि अभाविपचे कार्यकर्ते यानंतर आमनेसामने आली.
यानंतर अभाविपचे आंदोलन असंवैधानिक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी केली. या मागणीसाठी आज सर्व आंबेडकरी संघटनांनी विद्यापीठ बंद केले. आज सकाळीपासूनच विद्यापीठात विविध आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जमून जोरदार घोषणाबाजी केली. विद्यापीठाची मुख्य इमारत, विविध विभागात जात कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. यावेळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.