चोरीच्या गाडीवर पोलिसांचा अंबर दिवा, सायरन लावून फिरणाऱ्या तोतयास बेड्या
By राम शिनगारे | Published: March 26, 2023 08:44 PM2023-03-26T20:44:44+5:302023-03-26T20:44:53+5:30
गुन्हे शाखेचे कारवाई : पोलिस कॅप, युनिफॉर्म, बनावट लोखंडी पिस्टलही जप्त
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यातील मिनी घाटीसमोरून चोरलेल्या स्कार्पिओ गाडीवर पोलिसांचा अंबर दिवा बसवून, सायरन लावून, बनावट लोखंडी पिस्टल, पोलिसांची कॅप, युनिफॉर्म गाडीत घेऊन फिरणारा तोतया पोलिस अधिकाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आवघ्या ३६ तासाच्या आत स्कार्पिओ गाडीसह बनावट साहित्यही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
संजय उर्फ मदन सुंदरराव पोपळघट (३३, रा. गल्ली नं.३ राऊतनगर, जालना, ह.मु. व्यंकटेशा रेसिडेन्सी, हिरापुर शिवार) असे तोतयाचे नाव आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रविण वाघ यांच्या पथकास मिनी घाटीच्या समोरून चोरलेली गाडी (एमएच २० डीजे १२५२) घेऊन जाण्यासाठी बीड बायपास परिसरात एकजण येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून पोपळघट यास पकडले. तेव्हा गाडीची पाहणी केल्यानंतर त्यावर पोलिसांचा अंबर दिवा आढळला.
तसेच गाडीच्या आतमध्ये सायरन, पोलिसांचा युनिफाॅर्म, पी-कॅप, बनावट लोखंडी पिस्टल आणि गाडीवर पोलिस असे लिहिलेले एक स्टिकरही पोलिसांना आढळले. त्याशिवाय बनावट क्रमांक टाकलेली चोरीची दुचाकीही तोतयाकडे आढळली. पोलिसांनी एकुण चोरीची दुचाकी, चारचाकीसह १० लाख ९० हजार ९९५ रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रविण वाघ, सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव, अंमलदार योगेश नवसारे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, तातेराव सिनगारे, ज्ञानेश्वर पवारर आणि अश्वलिंग होनराव यांनी केली. आरोपीस एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.