अंबर म्हणजे अमूल्य हिरा; जाणून घ्या औरंगाबादचे शिल्पकार गुलाम चापू ऊर्फ मलिक अंबरची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 08:14 PM2020-05-14T20:14:39+5:302020-05-14T20:21:06+5:30

आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

Amber means priceless diamond; Learn the story of Ghulam Chapu alias Malik Amber, a architect of Aurangabad | अंबर म्हणजे अमूल्य हिरा; जाणून घ्या औरंगाबादचे शिल्पकार गुलाम चापू ऊर्फ मलिक अंबरची कथा

अंबर म्हणजे अमूल्य हिरा; जाणून घ्या औरंगाबादचे शिल्पकार गुलाम चापू ऊर्फ मलिक अंबरची कथा

googlenewsNext
ठळक मुद्देनहर-ए- अंबरीद्वारे शहरात पाणी आणलेशेतसारा वसुली, तोडरमल पद्धती केली सुरू

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : इथिओपियाच्या कंबाटा प्रांतात जन्मलेला चापू हा कृष्णवर्णीय. त्याचे कुटुंब मूर्तिपूजक. आता आपण ज्या शहराला हरारे म्हणून ओळखतो, ते अन्कंबाटा हा डोंगराळ परिसर. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीशी नाते सांगणारा. त्या डोंगराळ भागाला अबसिनिया या प्रदेशातील लोकांना हबशी म्हटले जाते. चापूची गुलाम म्हणून विक्री होत-होत तो अहमदनगरात पोहोचला. युद्धनीती व चातुर्याच्या जोरावर राज्यकारभार हाती घेत त्याने तत्कालीन औरंगाबाद वसविले. आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

डोंगरदऱ्यात  राहणारे हबशी लोक अंगपिंडाने काटकच. तो काळ गुलाम विकण्याचा. चापूच्या कुटुंबाने त्याची विक्री केली. येमेनहून तो बगदादला आणला गेला. तेथील बाजारात बगदादचा दलाल मीर कासीमने त्याला विकत घेतले. चापू अंगाने काटक  आणि बुद्धीनेही चुणचुणीत असल्याचे हेरून कासीमने त्याला शिकवणे सुरू केले. त्याला इस्लाम बनविले आणि नाव ठेवले अंबर. अंबर म्हणजे अरबी भाषेत अमूल्य हिरा. वाळवंटात कालव्याने खेळणारे पाणी चापू पाहत होता.  शिकत होता. युद्धकला व अरबी भाषेतही तो निपुण झाला. पैलू पाडलेला हा हिरा कासीमने भारतातील अहमदनगरच्या निजामाला विकला. निझामाचा पंतप्रधान चंगेजखानने त्याला विकत घेतले. चंगेजखानही हबशी होता. अष्टपैलू अंबरने लवकरच चंगेजखानच्या हृदयात आपले स्थान मिळविले व त्याचा तो मानसपुत्र ठरला. चंगेजखानच्या निधनानंतर अंबरची गुलामी गेली व तो स्वतंत्र सैन्य उभारून सेनापती झाला.

तत्कालीन दख्खनमध्ये अहमदनगरचा निजाम, विजापूरचा अदिलशहा आणि उत्तरेत मुगल होते. सत्तासंघर्ष पेटलेला होता. यात अंबर उतरला. त्याच्या सैन्य दलात अरबी व हबशी शिपाई होते.  त्याने इथियोपियातील युद्धकला शिकवून सैन्यास निष्णात केले होते. आता दरारा व लौकिकही होऊन तो मलिक अंबर नावाने ओळखला जात होता. नगरच्या चांदबीबीच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहपासून निजामशाही वाचविण्यासाठी मलिक अंबरला निमंत्रण गेले. त्याने अकबराच्या सैन्याला पळवून लावले. अल्पवयीन सुलतानाला गादीवर बसवून मलिक अंबरने सत्ता हाती घेतली. त्याने पुढे खडकी हे सुनियोजित शहर वसविले. त्यात निजामशाहीची राजधानी हलविली. नहर- ए- अंबरी ही योजना आखून नहरीने शहरात पाणी आणले. शेतसारा वसुली तोडरमल पद्धतीने सुरू केली. रस्ते बांधले. अनेक इमारती उभारल्या. त्याने उभारलेली बाबा शाह मुसाफिर यांच्यासाठीची पाणचक्की आजही कार्यरत आहे. मलिक अंबरच्या सर्वात विश्वासू सरदारात मालोजी आणि विठोजी होते. या भोसले बंधूंकडे वेरूळची जहागिरी होती. 

या महान प्रशासक व युद्धकुशल सेनापतीची १४ मे रोजी पुण्यतिथी आहे. पैठण येथे जन्मलेले शेख चांद यांनी १९३० मध्ये संशोधन करून मलिक अंबर हे  १६२ पानांचे उर्दू भाषेतील पुस्तक  लिहिले आहे. यासाठी त्यांनी मोठे संशोधनही केले. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण दिल्लीचे  सय्यद माजेद जनाह यांनी २०१९ मध्ये केले. त्यात त्यांनी शेख चांद यांनी केलेले संशोधन जोडले असून, आता हे पुस्तक २०८ पानांचे झाले आहे. औरंगाबादेतील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी हे त्यांचे देशातील वितरक आहेत.

Web Title: Amber means priceless diamond; Learn the story of Ghulam Chapu alias Malik Amber, a architect of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.