आकांक्षा देशमुखच्या खुनाचे गूढ कायम; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी घटनास्थळाची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:07 PM2018-12-13T22:07:30+5:302018-12-13T22:08:12+5:30
आकांक्षा तिच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती, तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या.
औरंगाबाद : एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून तेथे राहणाऱ्या डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (वय २२, रा. माजलगाव) या विद्यार्थिनीचा खून कोणी आणि कसा केला, याचा उलगडा २४ तासांनंतरही पोलिसांना करता आला नाही. दरम्यान, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे पथक, सिडको पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकानी गुरुवारी वसतिगृहातील आकांक्षाच्या रूमची पाहणी केली आणि ही घटना कशी झाली असेल, याबाबत मंथन केले. शिवाय वसतिगृह परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पोलिसांनी तपासणी सुरू केली.
आकांक्षा ही एमजीएम फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स आॅफ फिजिओथेरफी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. एमजीएम कॅम्पसमधील गंगा मुलींच्या वसतिगृहात ती राहत होती. ११ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास आकांक्षा तिच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या. ही माहिती पोलिसांना न कळविता उपस्थितांनी लगेच आकांक्षाला एमजीएममधील अपघात विभागात दाखल केले. तेथील डॉक्टर निपुण केसरकर यांनी आकांक्षाला तपासून मृत घोषित केले.
याबाबतची एमएलसी सिडको पोलीस ठाण्याला रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास प्राप्त झाली. त्यानंतर आकांक्षाचे चुलतभाऊ डॉ. राहुल देशमुख आणि अन्य लोकांनी आकांक्षाचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन अहवालामध्ये आकांक्षाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या तक्रारीवरून सिडको ठाण्यात बुधवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांनी आकांक्षाचा लॅपटॉप, मोबाईल आणि एक डायरी जप्त केली. या डायरीतील मजकूर पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. १० डिसेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता एका व्यक्तीने तिला फोन केला. त्यावेळी आकांक्षा त्या व्यक्तीसोबत केवळ ४० सेकंद बोलली. ती व्यक्ती कोण आणि त्यांच्यात काय बोलणे झाले, याबाबतचा पोलिसांनी तपास सुरू केला.
डॉक्टरांच्या पथकांकडून चार तास तपासणी
हा खून कसा झाला असावा, याचा तपास करण्यासाठी सिडको पोलिसांच्या सूचनेवरून घाटीतील शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे पथक गुरुवारी एमजीएम कॅम्पसमधील घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाने सुमारे चार तास रूमची पाहणी करून मृतदेह कसा पडलेला होता. शिवाय रूममधील टेबल, खुर्ची, पलंग कोणत्या स्थितीत होते? ही माहिती जाणून घेतली.
बांधकाम मजुरांची होणार चौकशी
शवविच्छेदन अहवालानुसार घटना उघडकीस येण्याच्या पंधरा ते अठरा तासांपूर्वी आकांक्षाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. गंगा वसतिगृहातील चौथ्या मजल्यावर आकांक्षाची रूम होती. त्या रूमच्या विरुद्ध बाजूने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. झारखंड राज्यातून बांधकामासाठी मजूर आलेले आहेत. या मजुरांची यादी पोलिसांनी मिळविली असून, त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
गंगा वसतिगृहातील ७२ तासांतील सीसीटीव्ही फुटेजची तसेच वसतिगृहामागील इमारतीवर लावण्यात आलेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजची सिडको पोलिसांनी तपासणी सुरू केली. या फुटेजमधून महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागेल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.
मृतदेह हलविल्यामुळे वाढले पोलिसांचे काम
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी म्हणाल्या की, खुनाचा गुन्हा नोंदवून आम्ही तपास सुरू केला. तिचा खून झाला असे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. शिवाय ही आत्महत्याही असू शकते, असेही म्हटले जात आहे. मात्र आत्महत्येसारखा कोणताही पुरावा घटनास्थळी आढळला नाही. घटनास्थळावरून मृतदेह हलविण्यात आल्याने आमचे काम वाढल्याचे त्यांनी सांगितले.
मृताच्या नातेवाईकांचा जबाब नोंदविणार
आकांक्षाचे आई-वडील, चुलत भाऊ यांचेही जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. तिच्या खुनामुळे कोणाला आर्थिक लाभ होणार होता, का यादृष्टीनेही तपास केला जाणार आहे.