पीएनजी पुरवठा करणारी महत्वाकांक्षी पाइपलाइन योजनाच गॅसवरच !

By विकास राऊत | Published: November 25, 2023 07:19 PM2023-11-25T19:19:37+5:302023-11-25T19:19:50+5:30

१ डिसेंबरची डेडलाइन हुकणार : शहरात २०७ पैकी फक्त ६० कि. मी.चे काम

Ambitious PNG pipeline plan is on gas in Chhatrapati Sambhajinagar | पीएनजी पुरवठा करणारी महत्वाकांक्षी पाइपलाइन योजनाच गॅसवरच !

पीएनजी पुरवठा करणारी महत्वाकांक्षी पाइपलाइन योजनाच गॅसवरच !

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाइपलाइनद्वारे गॅस मिळण्याची १ डिसेंबरची डेडलाइन हुकण्याची शक्यता आहे. शहरात ६० कि. मी.पर्यंतचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामाला अद्याप गती मिळत नसल्यामुळे गॅस पाइपलाइन सध्या तरी गॅसवरच असल्याचे दिसत आहे. शहरात डिसेंबर २०२२ पर्यंत घरोघरी पीएनजी मिळेल, असा दावा पावणेदोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. दोन हजार कोटींचा हा पूर्ण प्रकल्प आहे. अहमदनगर घाटातील काम पूर्ण झालेले नाही. शहरात मनपाच्या दोन झोनमधील घरांमध्ये गॅस किट फिटिंग केली आहे. परंतु, त्या घरांना कनेक्शन कुठून देणार, असा प्रश्न आहे. महापालिका आणि भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशनमध्ये रस्ते खोदण्यासाठी किती रक्कम आकारायची, याचा निर्णय न झाल्यामुळे वेळेत काम होण्याबाबत साशंकता आहे.

तर स्वस्तात गॅस मिळणे अवघड
बीपीसीएल कंपनी आणि मनपाच्या पाइप नॅचरल गॅससंबंधी असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या तर नागरिकांना पीएनजीचा स्वस्त गॅस मिळणारच नाही, अशी परिस्थिती आहे. शहरात पीएनजीचे (पाइप नॅचरल गॅस) जाळे अंथरण्यासाठी रस्ते खोदावे लागतील. त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १२ हजार रुपये प्रति रनिंग मीटरप्रमाणे रक्कम देणे आवश्यक आहे. ही रक्कम सुमारे ८०० कोटींच्या घरात जाते. ८०० कोटी बीपीसीएलकडून मिळाले तरच पाइपलाइनचे काम पुढे सुरू होईल. याबाबत अद्याप वाटाघाटींसाठी बैठक झालेली नाही. परिणामी, नागरिकांना स्वस्त गॅस मिळणार नाही.

नदीपात्रातून काम सुरू
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदामार्गे वाळूजमध्ये येणाऱ्या गॅस पाइपलाइनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा, असे आदेश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सप्टेंबरमध्ये दिले होते. आता १ डिसेंबर आठवड्यावर आहे. गोदावरी नदीपात्रात एचडीडी मशिनच्या माध्यमातून गॅस पाइपलाइनचे काम सुरू असून, १३०० मीटर क्रॉसिंगचे काम लवकर पूर्ण करण्याचा दावा बीपीसीएल सूत्रांनी केला.

योजनेतून काय मिळणार?
७ लाख घरगुती व ४ हजार व्यावसायिक गॅस कनेक्शन देण्याचा पहिला टप्पा आहे. एक हजार कनेक्शन उद्योगांना, १०० ठिकाणी गॅस पंप सुरू करण्याचे नियोजन आहे.

२५ हजार जोडण्या पहिल्या टप्प्यात
बीपीसीएल २५ हजार कनेक्शन पहिल्या टप्प्यात शहरात देण्याचा दावा करत आहे. गॅस पाइपलाइन आल्यावर जोडणी घेताना ठराविक रक्कम भरून सध्याचा सिलिंडर नागरिकांना परत करावा लागेल. योजनेत शहरात २०७ पैकी झाले फक्त ६० कि. मी.चे काम झाले आहे.

तोडगा अजून निघेना...
श्रीगोंदा येथून मुख्य गॅस पाइपलाइनचा व्हॉल्व्ह आहे. तेथून अहमदनगरमार्गे वाळूज ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पाइपलाइन टाकली जाईल. वाळूजपर्यंत पाइपलाइन आली तरी सात ते आठ ग्रामपंचायत हद्दींमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाबाबत अजून पर्यायी तोडगा निघालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Ambitious PNG pipeline plan is on gas in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.