रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी मोजावे लागले पाचशे रुपये
By Admin | Published: May 17, 2017 12:20 AM2017-05-17T00:20:19+5:302017-05-17T00:27:10+5:30
जेवळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या डिझेलचा भुर्दंडही रुग्णांच्या नातेवाईकांनाच सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जेवळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने प्रसुतीसाठी आलेल्या एका मातेला सास्तूर येथील रुग्णालयात रेफर करण्याची वेळ सोमवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांवर आली़ विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या डिझेलचा भुर्दंडही रुग्णांच्या नातेवाईकांनाच सहन करावा लागला. तर रात्रीच्यावेळी इतर रुग्णांवर कर्मचाऱ्यांकडूनच प्रथमोपचार होत असल्याचे समोर आले़
लोहारा तालुक्यातील जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत दक्षिण जेवळी, वडगाव, विलासपूर पांढरी या तीन उपकेंद्रासह रूद्रवाडी, फणेपूर, पूर्व ताडा, वडगाव वाडी, माळेगाव, हिप्परगा, पश्चिम तांडा या गावाचा समावेश आहे. गत दीड वर्षा पासून एका डॉक्टरांचे पद रिक्त आहे़ त्यामुळे एकाच डॉक्टर वरती येथील कारभार सुरू आहे़ परंतु तेही डॉक्टर २ मे पासून मेडीकल रजेवर गेल्याने प्रभारी डॉक्टरवरती हे आरोग्य केंद्र सुरू आहे़
१५ मे रोजी रोजी प्रभारी डॉक्टर केंद्रात आलेच नाहीत़ त्यांच्या अनुपस्थितीत १३ रुग्णाची तपासणी येथील कर्मचाऱ्यांनीच केली. सोमवारी सायंकाळी सहा वाजता दक्षिण जेवळी येथील फैमून जुबेर शेख ही महिला प्रसुतीसाठी आली होती. मात्र, डॉक्टर नसल्याने या महिलेला सकाळी आठ वाजता सास्तूरच्या स्पर्श रुग्णालयात रेफर करण्यात आले. या रुग्णासोबत सामाजिक कार्यकर्त्या नसरीन शेख व आशा कार्यकर्ती प्रमिला चव्हाण, साजिदास शेख उपस्थित होत्या. आरोग्य केंद्रातील थंड पाण्याचे रेफ्रिजेटर बंद होते़ तर बाथरूममध्ये दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधारातच रुग्णाना याचा वापर करावा लागत होता. या गैरसोयी बद्दल रुग्णाच्या नातेवाईकानी नाराजी व्यक्त केली. या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक ही पदे गेल्या पाच वषार्पासून रिक्त आहेत़ कंञाटी आरोग्य सेविका, कंञाटी पर्यवेक्षक ही पदे भरलीच नाहीत़ तर हवालदार, चालक ही पदे रिक्त आहेत़