पुढे जाण्याच्या स्पर्धेत रूग्णवाहिकेलाही मिळत नाही रस्ता; ना कोणाला दंड, ना कोणाला शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:01 PM2021-01-20T12:01:19+5:302021-01-20T12:04:32+5:30
Traffic Jam in Aurangabad कधी वाहतूक सिग्नलवर वाहनांच्या गर्दीतून पुढे जाण्याची कसरत, तर कधी सायरनचा आवाज ऐकूणही रस्ता देण्याकडे दुर्लक्ष करणारे हट्टी वाहनचालक.
औरंगाबाद : सायरन वाजवित जाणारी रुग्णवाहिका... रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्याची रुग्णवाहिकाचालकाची धडपड. पण त्याच्या ध्येयात रस्त्यावरील अडथळ्यांची आडकाठी. कधी वाहतूक सिग्नलवर वाहनांच्या गर्दीतून पुढे जाण्याची कसरत, तर कधी सायरनचा आवाज ऐकूणही रस्ता देण्याकडे दुर्लक्ष करणारे हट्टी वाहनचालक. येथे रूग्णवाहिकेलाही सहजासह रस्ता मिळत नाही. कारण कोणाला गांभिर्यच नाही. ना दंड होतो ना कोणाला शिक्षा.
मोंढानाक्याकडून मंगळवारी दुपारी एक रुग्णवाहिका सायरन वाजवित सेव्हन हिल परिसरातील रुग्णालयाकडे जात होती. या रुग्णवाहिकेच्या पाठलाग करून रस्त्यावर चालकाला कोणकोणत्या अडथळ्याला सामोरे जावे लागते, रुग्णवाहिका कशापद्धतीने मार्ग काढून रुग्णाला वेळेत रुग्णालयात पाेहोचविते, याचा आढावा लोकमत प्रतिनिधीने घेतला. मोंढानाका येथून दुपारी १.२४ वाजता निघालेली रुग्णवाहिका दुपारी १.३२ वाजता रुग्णालयात पोहोचली. या ८ मिनिटांच्या प्रवासात रुग्णवाहिकेची रस्त्यावरील रिक्षा, दुचाकी, चारचाकीच्या अडथळ्याने कसोटीच लागली. वाहतूक पोलीस रस्ता मोकळा करून देण्यासाठी धाव घेतात. पण अडथळा करणाऱ्यावर कोणती कारवाईच होत नाही.
रुग्णवाहिकेस अडथळा, पण दुर्लक्ष
मोंढानाका ते सेव्हन हिलपर्यंतच्या प्रवासात रुग्णवाहिकेला समोरील वाहनांचे अडथळे पार करावे लागले. आकाशवाणी चौकात बॅरिकेट्स लावून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती. त्यामुळे मोंढानाका येथून निघाल्यानंतर सिग्नलवर थांबण्याची वेळ आली नाही. परंतु पुढे जाण्याच्या वेगात दुचाकीचालक रस्ता देण्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे रुग्णवाहिकाचालक डाव्या बाजूने मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होता.
रुग्णवाहिकेस अडथळा केल्याप्रकरणी दंडच नाही
रुग्णवाहिकेस अडथळा केल्याप्रकरणी एखाद्याला दंड करण्यासाठी स्वतंत्र कलम नाही. परंतु नियमित पद्धतीने कारवाई केली जाते, असे वाहतूक पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले. रुग्णवाहिकेला रस्ता देण्यास बहुतांश जण प्राधान्य देतात. परंतु काही जण त्यास अपवाद ठरतात. दंडच होत नसल्याने अशांना कारवाईची भितीही नाही.
लोकांनी सहकार्य करावे
रुग्णवाहिकेत गंभीर रुग्ण असतात. त्यांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे आवश्यक असते. अनेक लोक मागे वळून वळून पाहतात, पण रस्ताच देत नाही. लोकांनी सहकार्य केले पाहिजे. उजवी बाजू मोकळी मिळत नाही. त्यामुळे डाव्या बाजुने रुग्णवाहिका न्यावी लागते.
-सुनील नवगिरे, रुग्णवाहिका चालक
मार्ग करून देण्यास प्राधान्यक्रम
रुग्णवाहिकेला अडथळा आणल्यास कारवाईची मोटार व्हेईकल ॲक्टमध्ये तरतूद नाही. परंतु असे काही झाले इतर ॲक्टखाली कारवाई करता येते. रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देणे, याला सर्वाधिक प्राधान्यक्रम असतो. विरुद्ध दिशेने, सिग्नल लागलेले असताना अन्य वाहतूक बाजूला करून रुग्णवाहिकांना पुढे जाऊ दिले जाते.
- सुरेश वानखेडे, सहायक पोलीस आयुक्त