बायपासवरील अपघातमुक्तीसाठी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 05:20 PM2019-06-07T17:20:36+5:302019-06-07T17:24:40+5:30

या उपक्रमानंतर जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेतले.

Ambulance help riders came to the rescue bypass accidental area | बायपासवरील अपघातमुक्तीसाठी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ सरसावले

बायपासवरील अपघातमुक्तीसाठी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ सरसावले

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्यावरील समस्यांकडे वेधले लक्ष

औरंगाबाद : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेणारे ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’चे सदस्य अपघातमुक्तीसाठीही रस्त्यावर उतरले आहेत. बीड बायपासवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने अपघाताच्या घटना वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारून अपघातमुक्तीसाठी आगळावेगळा उपक्रम राबविला.

बीड बायपास रस्त्यावर गत काही दिवसांत लहान-मोठे अनेक भरपूर अपघात घडले. पांढरे पट्टे आणि रिफ्लेक्टर नसल्याने रस्त्यावरील गतिरोधक दूर अंतरावरून लक्षात येत नसत. यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ होत होती. प्रशासनाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे, परावर्तित पट्टी लावणे गरजेचे आहे; परंतु हे होत नसल्याचे निदर्शनास येताच २ जून रोजी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’च्या सदस्यांनी एकत्र येऊन संग्रामनगर उड्डाणपूल चौक, आय्यप्पा मंदिर टी-पॉइंट, रेणुकामाता मंदिर कमान, देवळाई चौक, एमआयटी कॉलेज चौक, माऊलीनगर टी-पॉइंट या ठिकाणच्या रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले. सदस्यांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावरील खडीही दूर केली. पांढरे पट्टे मारल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना किमान काही प्रमाणात का होईना गतिरोधक आहे, हे लक्षात येईल. अपघात टाळण्यास हातभार लागण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना  नागरिकांनी व्यक्त केली.

यासाठी जगदीश एरंडे यांची विशेष मदत झाली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी, समन्वयक अ‍ॅड. अक्षय बाहेती, स्वप्नील चंदने, अभिषेक कादी, हर्षल पाटील, विनोद रुकर, रितेश जैन, किरण शर्मा, मीना परळकर, मनोज जैन, भूषण कोळी, अमोल कुलकर्णी, मोहित धानुका, राहुल जोशी, कृष्णा तुंगे, सत्यजित वर्मा, अमोल पाटील, हर्षल भराड, स्मिता नगरकर, स्मिता जोशी, मंजू खंडेलवाल, शिवांगी कुलकर्णी, जयश्री बेद्रे, नंदकुमार कुलकर्णी, शशांक चव्हाण,  स्वप्नील आल्हाड, प्रथमेश दुधगावकर आदींनी प्रयत्न केले.

प्रशासन लागले कामाला
‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’च्या उपक्रमानंतर जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील सुविधांकडे प्राधान्याने आणि नियमितपणे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.

१६८ अपघातग्रस्तांना मदत
अपघातग्रस्तांना मदत आणि रुग्णवाहिकेला गर्दीतून रस्ता मोकळा करून देणे, या उद्देशातून अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सने काम सुरू केले. गेल्या काही दिवसांत १६८ अपघातग्रस्तांना मदत केली आहे. यातून अनेकांचा जीव वाचण्यास मदत झाली.
 

Web Title: Ambulance help riders came to the rescue bypass accidental area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.