शहरात दररोज १३ रुग्णांना घेऊन अॅम्बुलन्सची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:02 AM2021-04-28T04:02:07+5:302021-04-28T04:02:07+5:30
औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेड्स मिळविणे अत्यंत अवघड झाले आहे. कारण आयसीयू, व्हेंटिलेटर रिकामे नसल्याने रुग्णालयांना नकार ...
औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेड्स मिळविणे अत्यंत अवघड झाले आहे. कारण आयसीयू, व्हेंटिलेटर रिकामे नसल्याने रुग्णालयांना नकार देण्याची वेळ ओढवत आहे. शहरात ३ रुग्णवाहिकांना १३ रुग्णांना घेऊन फिरावे लागते. ही फक्त ३ रुग्णवाहिकांची स्थिती आहे. जिल्ह्यात ३३८ रुग्णवाहिका आहे, मग त्यातून किती रुग्णांना बेड मिळविण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भटकावे लागत असेल, याचा केवळ विचारच केलेला बरा. फक्त गंभीर रुग्णांच्या उपचाराची सुविधा वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील घाटी रुग्णालयात व अन्य दोन खाजगी रुग्णालयांत रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. शहरासह ग्रामीण भागांतून आणि अन्य जिल्ह्यांतून रुग्णांना घेऊन आल्यानंतर कोणकोणत्या बाबींना सामोरे जावे लागते, याचा उलगडा रुग्णवाहिका चालकांनी केला. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दाखल करताना नातेवाईक संबंधित रुग्णालयांशी आधीच बोलून घेतात आणि नंतरच रुग्ण नेण्यास प्राधान्य देतात; परंतु तरीही रुग्ण नेल्यानंतर रुग्णालयांसमोर रुग्णवाहिकेतच रुग्णांना ठेवून दाखल होण्याची वाट पाहत बसावी लागते. आणलेला रुग्ण ऑक्सिजन बेड नाही, व्हेंटिलेटर नाही म्हणून रुग्णालये नाकारतात. त्यामुळे ऐनवेळी अन्य रुग्णालयाची शोधाशोध करावी लागते अथवा सरळ घाटीत रुग्णाला न्यावे लागते, असे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले. औरंगाबादेत मंगळवारी केवळ २ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. त्यामुळे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर लागले तर भटकंती करण्याचीच वेळ ओढवत असल्याची स्थिती आहे.
------
शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार
केले जाणारी काही रुग्णालये
एकूण बेड्स -उपलब्ध बेड्स
जिल्हा सामान्य रुग्णालय- ३०० -९३
एमजीएम हाॅस्पिटल- ५५२ -७६
धूत हाॅस्पिटल- १५० -२५
मेडिकव्हर हाॅस्पिटल- ७५ -०
ओरियन सिटी केअर- ४३ -०
युनायडेट सिग्मा हाॅस्पिटल- १५० -०
लाइफ मल्टी स्पेशा. हाॅस्पिटल- ४४ -२०
आशिष हाॅस्पिटल- ४० - ५
मॅक्स केअर हाॅस्पिटल- १६ -१
न्यू लाइफ बाल रुग्णालय- १० -०
लाइफलाइन मल्टी स्पेशा. हाॅस्पिटल- ७५ १०
सुमनांजली हाॅस्पिटल- ४० ९
गजानन हाॅस्पिटल- ६० ०
------
रुग्णांना घेऊन फिरण्याची वेळ
-----
दिवसभरात ४ फेऱ्या
रुग्णवाहिका चालक सुरेश पंडुरे म्हणाले, गंगापूरहून कोरोना रुग्णांना घेऊन येतो. दिवसभरात ४ फेऱ्या होतात. गंगापूरहून पाऊण तासात औरंगाबादेत पोहोचतो. कधी घाटीत तर खाजगी रुग्णालयात रुग्ण पोहोचवतो. खाजगी रुग्णालयासमोर अनेक तास उभे राहावे लागते. बेड नाही मिळाला तर इतर रुग्णालयाकडेही जावे लागते. ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, अशी कारणे सांगितली जातात.
---
दिवसभरात ५ फेऱ्या
रुग्णवाहिका चालक राजीव श्रीसुंदर म्हणाले, एका रुग्णालयात दाखल रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पोहोचविण्याचे काम प्राधान्याने करतो. अशा दिवसभरात किमान ५ फेऱ्या होतात. रुग्णाला अन्य रुग्णालयात का हलविले जाते, हे नातेवाईक सांगत नाहीत. त्यांना जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे काम करताना आता फार भीतीही वाटत नाही.
------
दिवसभरात ४ फेऱ्या
रुग्णवाहिका चालक सोपान गुंजाळ म्हणाले, नेवाशाहून सध्या औरंगाबादेत रुग्णांना घेऊन येतो. दिवसभरात ४ फेऱ्या होतात. रुग्ण हलविण्यापूर्वी नातेवाइकांचे रुग्णालयांशी बोलणे झालेले असते. तरीही कधीकधी रुग्णाला घेऊन गेल्यानंतर रुग्णाला दाखल करून घेण्यास अडचणी येतात. ऑक्सिजन बेड नाही, व्हेंटिलेटर रिकामे नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे रुग्णाला ऐनवेळी दुसरीकडे घेऊन जावे लागते.