जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:04 AM2021-05-30T04:04:36+5:302021-05-30T04:04:36+5:30
सिल्लोड / सोयगाव : १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या मिळालेल्या व्याज रकमेतून जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नॉन-एसी रुग्णवाहिका ...
सिल्लोड / सोयगाव : १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या मिळालेल्या व्याज रकमेतून जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नॉन-एसी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी तसा आदेश दिला आहे. यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार आहे. संबंधित आरोग्य केंद्राच्या ग्रामपंचायतींनी रुग्णवाहिका खरेदी करायची आहे, असे आदेशात डॉ. गोंदावले यांनी म्हटले आहे.
शहरांचा भाग वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या आहेत, तर काही आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिकांची गरज असल्याचे वेळोवेळी लक्षात आले. यावर जि.प. सीईओ यांनी लक्ष घालत १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेच्या व्याजावर मिळालेल्या रकमेतून रुग्णवाहिका खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णवाहिकेअभावी ढेपाळलेली ग्रामीण आरोग्यसेवा आता गतिमान होईल. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला तोंड देण्यासाठी ही आरोग्य विभागाची पूर्वतयारीच असू शकते.
----
ग्रामविकास विभागाने दिली मान्यता
१३ व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधी आणि १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून हे शक्य होऊ शकते. हे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिले, तसेच त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या निधीच्या उपलब्धतेसाठी ग्रामविकास विभागाने मान्यता दिली, तसेच सोयगावच्या जि.प. सदस्या पुष्पा काळे यांनीदेखील २०१९ व २०२० मध्ये ऑनलाइन सर्वसाधारण बैठकांत हा विषय मांडला होता. यासंबंधी बैठकीत ठरावही मंजूर करण्यात आला होता.
----