शिवसेनेच्या लोकार्पणावर मनपा प्रशासनाचा बहिष्कार; भाजपकडूनही कोंडी करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:54 AM2018-12-22T11:54:46+5:302018-12-22T11:56:33+5:30
युती तोडण्यासाठी वरिष्ठस्तरावर गांभीर्याने विचार चालू असल्याची माहिती
औरंगाबाद : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सकाळी स्मार्ट शहर बस आणि १६१ एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्लँटचे लोकार्पण करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. या अशासकीय कार्यक्रमावर मनपा प्रशासनाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची चारही बाजूने कोंडी करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वरिष्ठ स्तरावर युती तोडण्यावरही गांभीर्याने विचार चालू आहे.
केंद्रात काँग्रेस आघाडी सरकार असताना शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला २३० कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपये मनपाला मंजूर केले आहेत. शहर बस, भूमिगत गटार योजनेत बांधण्यात आलेले एसटीपी प्लँट, रस्ते या सर्व कामांसाठी शासनाचे अनुदान प्राप्त आहे.
या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन राज्य शासनाच्या संबंधित विभागाचे मंत्री यांच्या उपस्थितीत करावे, अशी भूमिका भाजपच्या मनपातील मंडळींनी धरली. शिवसेनेने अगोदरच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना २३ डिसेंबर रोजी विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन ठेवले. नगरविकास विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवा, असे उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे यांनी मागणी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात औरंगाबादला येण्याचे मान्यही केले.
शिवसेना नियोजित वेळेनुसारच २३ डिसेंबरला आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बस आणि एसटीपी प्लँटचे लोकार्पण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. शुक्रवारी महापौरांनी राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमाची पत्रिका तयार करण्याचे आदेश दिले. या पत्रिकेवर विनीत म्हणून महापालिका औरंगाबाद एवढाच उल्लेख राहणार आहे.
शहर बस कशा आणणार ?
क्रांतीचौक येथे शहर बसचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मनपा प्रशासनाची या कार्यक्रमाला संमती नसेल तर क्रांतीचौकात शहर बस कशा येतील ? पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर बस क्रांतीचौकात दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईही करण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केल्याचे कळते.
प्रशासनाचे महापौरांना पत्र
शहर बस, रस्ते, एसटीपी प्लँट आदी कामांसाठी शंभर टक्के शासनाचा निधी आहे. विकासकामांच्या लोकार्पण, भूमिपूजन सोहळ्यास नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उपस्थित राहणे योग्य आहे, असे पत्र मनपा प्रशासनातर्फे महापौरांना सादर करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास मनपा प्रशासन उपस्थित राहणार नाही, हे निश्चित.
भाजपची चाणक्यनीती
उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेची पूर्णपणे कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन लोकार्पण सोहळे संपताच युती तोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सेनेच्या बालहट्टाचा बीमोड करण्यासाठी नीती तयार करण्यात येत आहे.