मनपा बॅकफूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:02 AM2017-08-05T01:02:41+5:302017-08-05T01:02:41+5:30
कन्हैयाकुमार यांचा कार्यक्रम ७ आॅगस्ट रोजी सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी महापालिकेने सुरक्षेच्या कारणावरून परवानगी नाकारली होती. विविध संघटनांनी महापालिकेसमोर आंदोलन छेडले होते. आंदोलकांची मागणी मान्य करीत शुक्रवारी दुपारी मनपा प्रशासनाने अटी व शर्थी टाकून सिडको नाट्यगृह दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अल्पावधीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार यांचा कार्यक्रम ७ आॅगस्ट रोजी सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी महापालिकेने सुरक्षेच्या कारणावरून परवानगी नाकारली होती. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत डाव्या आघाडीच्या विविध संघटनांनी महापालिकेसमोर आंदोलन छेडले होते. आंदोलकांची मागणी मान्य करीत शुक्रवारी दुपारी मनपा प्रशासनाने अटी व शर्थी टाकून सिडको नाट्यगृह दिले.
शुक्रवारी दुपारी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणार्र्थींना चर्चेसाठी आपल्या दालनात बोलावले. ५० पेक्षा अधिक कार्यकर्ते, नेते यावेळी हजर होते. एका कार्यकर्त्याने आयुक्तांना चक्क आत्मदहनाचा इशारा दिला. त्याने सोबत रॉकेलची बाटली आणली होती. कार्यकर्त्याची ही धमकी एकूण आयुक्त खवळले. त्यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. प्रा. राम बाहेती, अॅड. मनोहर टाकसाळ, अॅड. अभय टाकसाळ, भास्कर लहाने, शेखर जगताप, अय्यास शेख, विकास गायकवाड, अमरदीप वानखेडे आदींनी चर्चा केली. कन्हैयाकुमार यांच्या कार्यक्रमात कोणताच गोंधळ होणार नाही, यासंबंधीचे आश्वासन दिले. आयुक्तांनी अटी व शर्थी टाकून परत पवानगी देण्याचे मान्य केले. कार्यक्रमात सभागृहात तोडफोड किंवा नुकसान झाल्यास संयोजकांची जबाबदारी राहील, असेही त्यांनी बजावले.