अतिवृष्टीनंतर सभेत शब्दवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:23 AM2017-09-19T01:23:02+5:302017-09-19T01:23:02+5:30
नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण शहराची दाणादाण उडाली आहे. घर पडून आणि पुरात वाहून गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. ५० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये आजही रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहेत. त्यात भरीस भर म्हणून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले ओहत. नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.
१९ आॅगस्ट रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत वंदेमातरमच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. त्यामुळे महापौर बापू घडामोडे यांनी तहकूब सभा सोमवारी आयोजित केली होती. सभा सुरू होताच सर्वच पक्षांच्या नगरसेवक, नगरसेविकांनी अतिवृष्टीचा मुद्या उपस्थित केला. जयभवानीनगर, टाऊन हॉल परिसरातील नूर कॉलनीच्या नाल्याशेजारी राहणाºया नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार करण्यात आली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणे दोन दिवसांत काढण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. नूर कॉलनीची पाहणी आयुक्त, शहर अभियंता यांनी करून अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश महापौरांनी दिले.