स्वच्छतागृह बांधकामाच्या हिशोबाला मनपाचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 13:17 IST2018-10-18T13:16:19+5:302018-10-18T13:17:30+5:30
महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहाअभावी मुलींची कुचंबणा थांबविण्यासाठी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला.

स्वच्छतागृह बांधकामाच्या हिशोबाला मनपाचा ठेंगा
औरंगाबाद : महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहाअभावी मुलींची कुचंबणा थांबविण्यासाठी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला. त्यासाठी ‘सीएसआर’मधून विमानतळाने ८५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु महापालिकेकडून हिशोबच मिळत नसल्याने योजना रद्द करण्याचा विचार विमानतळ प्राधिकरणाकडून सुरू आहे.
स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतागृहे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली होती. ही बाब लक्ष देऊन दीड वर्षापूर्वी विमानतळाने मनपा शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधून देण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीचा एक प्रस्ताव प्राधिक रणाने मंजुरीसाठी मुख्यालयाला पाठविला होता. तेथून मंजुरी मिळताच मनपाला माहिती देण्यात आली. महापालिकेच्या जवळपास १९ शाळांमध्ये २७ स्वच्छतागृहे बांधण्याचे निश्चित करण्यात आले.
यासाठी विमानतळाने ८५ लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने मनपाला देण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार होते. काही स्वच्छतागृहे बांधली. परंतु काहींचे काम सुरू आहे तर काही अर्धवट आहे. याचा महापालिकेने हिशोबच प्राधिकरणाला दिला नाही, त्यामुळे निधीचे काय केले, याची माहिती देण्याची मागणी विमानतळ प्राधिकरणाने केली आहे.