बीड बायपासच्या सर्व्हिस रोडप्रकरणी पालिकेने झटकले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:53 PM2018-09-29T12:53:29+5:302018-09-29T12:55:23+5:30
मनपाने बांधकाम विभागाकडे बोट दाखवून सर्व्हिस रोड विकसित करण्याप्रकरणी हात झटकले आहेत.
औरंगाबाद : बीड बायपास मृत्यूचा महामार्ग बनला असून, त्याच्या रुंदीकरणासाठी, सर्व्हिस रोडसाठी मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआयच्या टोलवाटोलवीचा शेवट होत नसून मनपाने बांधकाम विभागाकडे बोट दाखवून सर्व्हिस रोड विकसित करण्याप्रकरणी हात झटकले आहेत.
१० सप्टेंबर रोजी रस्ते व परिवहन समितीच्या बैठकीत बीड बायपासप्रकरणी चर्चा झाली. त्यानंतर त्याबाबत काहीही उपाययोजना झाल्या नाहीत. सध्या रुंदीकरण, सर्व्हिस रोडचे प्रकरण ठप्प पडलेले आहे. सध्या बायपासला सर्व्हिस रोड कुणी करावा, याची जबाबदारी कुणीही घेण्यास तयार नाही, त्यामुळे त्या रस्त्यावर अपघाती मृत्यूचे तांडव सुरूच आहे. हजारो वाहने दिवसाकाठी त्या रस्त्यावरून धावत असून, तो रस्ता सद्य:स्थितीत ७ पदरी करणे गरजेचे आहे. जड वाहने, ओव्हरटेक लेन, कार लेन, दुचाकी लेन तेथे असली तरच तो रस्ता सुरक्षित होईल. एनएच-२११ जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत बायपासवरून वाहनांची वर्दळ राहणार आहे.
पालिकेचे ‘आॅफ दी रेकॉर्ड’ मत असे
महापालिकेचे आॅफ दी रेकॉर्ड मत असे आहे, सध्या बीड बायपास दोन्ही बाजूंनी प्रत्येक साडेसात मीटर दुभाजकासह आहे. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रस्ता रुंद करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यानंतर उर्वरित दोन्ही बाजूंनी शिल्लक राहिलेल्या जागेत मनपा सर्व्हिस रोड बांधू शकते. ६० मीटरचा तो पूर्ण रस्ता आहे. १८० फूट म्हणजेच सहा पदरी तो रस्ता बांधकाम विभागाने विकसित करणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी सहा ते सात वाहने जाऊ शकतात. सर्व्हिस रोड बनविण्यासाठी मनपाकडे सध्या निधी नाही. त्यामुळे बांधकाम विभागालाच तो रस्ता निर्माण करावा लागेल.
वीस दिवसांपासून चर्चा नाही
१० सप्टेंबर रोजी बीड बायपासवरून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, एनएचएआय प्रकल्प संचालक, बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता, वाहतूक पोलिसांमध्ये जोरदार चर्चा झाली. तातडीने बैठक घेण्याबाबत मनपाने तयारी केली; परंतु २० दिवस झाले. आजवर त्या रस्त्याच्या प्रकरणावर काहीही निर्णय झालेला नाही. रस्ता हस्तांतरण करणे, मनपाने कार्यवाही करण्याचे प्रकरण ‘जैसे थे’ आहे. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाही.