अतिक्रमणांचे ‘पाप’ मनपाचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:18 AM2017-09-01T01:18:11+5:302017-09-01T01:18:11+5:30
शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शहर विकास आराखड्यानुसार रस्ते जेवढे रुंद असायला हवेत तसा एकही रस्ता शोधून सापडणार नाही. अतिक्रमणांमुळे शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज सकाळ-संध्याकाळ अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अतिक्रमणांचे हे ‘पाप’ मागील काही वर्षांमध्ये महापालिकेनेच करून ठेवले आहे. मनपाचे पाप आम्ही का दूर करावे म्हणून वाहतूक पोलीस या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असतात. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया शहराला अतिक्रमणांचे हे गालबोट अशोभनीय आहे.
औरंगाबाद शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यात वाहनांची संख्याही वाढत आहे. लोकसंख्या वाहनांचा निकष तपासला असता रस्ते पूर्वीच्या तुलनेत आणखी लहान-लहान होत आहेत. शहराची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाºया जालना रोडवर सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ठिकठिकाणी हातगाडीचालक अतिक्रमणे करून पादचाºयांची वाट अडवून ठेवतात. सिडको बसस्थानक चौकात झालेल्या अतिक्रमणांमुळे दररोज सायंकाळी वाहनधारकांना ‘वाट’शोधावी लागते.