अद्भुत वास्तू वाटल्यामुळे अमेरिकन दाम्पत्याने मुलीचे ठेवले ‘एलोरा’ नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 07:44 PM2019-06-27T19:44:42+5:302019-06-27T19:46:51+5:30

२४ वर्षानंतर नाव ठेवलेल्या मुलीला वेरूळ दाखविण्यासाठी आले भारतभेटीवर

The American couple named child 'Ellora' after visiting caves | अद्भुत वास्तू वाटल्यामुळे अमेरिकन दाम्पत्याने मुलीचे ठेवले ‘एलोरा’ नाव

अद्भुत वास्तू वाटल्यामुळे अमेरिकन दाम्पत्याने मुलीचे ठेवले ‘एलोरा’ नाव

googlenewsNext

- राम शिनगारे

औरंगाबाद : चोवीस वर्षांपूर्वी एलोरा केव्हज्च्या (वेरूळ लेण्या) प्रेमात पडलेल्या अमेरिकेतील दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव चक्क ‘एलोरा’ ठेवले. या मुलीला नाव ठेवलेल्या जगविख्यात ठिकाणाची भेट व्हावी, तिने ते डोळ्याने पाहावे, यासाठी आईने एलोरा ही मुलगी व मुलगा वेल मॉर्गन यांना सोबत घेत औरंगाबाद गाठले आहे. 

वर्ष १९९५. अमेरिकेतील बांधकाम व्यावसायिक असलेले मॉर्गन दाम्पत्य पर्यटनासाठी भारत भेटीवर आले. या भेटीमध्ये त्यांनी अजिंठा- एलोरा लेण्यांना भेट दिली. या भेटीत त्यांना एलोरामधील अद्भुत, अवस्मिरणीय आर्किटेक्चर प्रचंड आवडले. बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे त्यांना या वास्तूचे महत्त्व लक्षात आले. त्यांनी जेव्हा आपणाला मुलगी होईल, तेव्हा तिचे नाव एलोरा ठेवण्याचा निर्णय घेऊन ते अमेरिकेत परतले. तीन मुलांनंतर २० डिसेंबर २००३ रोजी त्यांना मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी एलोरा अ‍ॅने ठेवले. आता ही मुलगी १५ वर्षांची झाली आहे. तेव्हा तिला तिच्या नावाचा इतिहास, वास्तूची भेट व्हावी, यासाठी बेथ मॉर्गन (आई) एलोरा आणि मुलगा वेल मॉर्गन यांना घेऊन २४ वर्षांनी औरंगाबादेत आल्या आहेत.

‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी एलोरा ही एक अद्भुत वास्तू आहे. त्या वास्तूचे विलक्षण गारूड आमच्यावर असल्यामुळे मुलीचे नाव एलोरा ठेवले. एलोरातील बांधकाम, त्यावरील कोरीव नक्षीकाम हे जगप्रसिद्ध आहे. त्याविषयी विशेष आकर्षण आहे. आम्ही २४ वर्षांपूर्वी मुलीचे नाव एलोरा ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पहिली तीन मुलेच झाली. त्यामुळे आम्ही आशा सोडली होती. मात्र, २००३ साली मुलगी झाली आणि तिचे नाव एलोरा अ‍ॅने ठेवल्याचेही बेथ मॉर्गन यांनी सांगितले. एलोराला घेऊन पुन्हा एलोरा-अजिंठा पाहण्यासाठी आल्याचाही विशेष आनंद वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांना माझ्या नावाचे विश्लेषण करून सांगते 
अमेरिकेत मित्रमंडळी जेव्हा माझ्या नावाविषयी विचारतात. तेव्हा सर्वांना माझ्या नावाच्या पाठीमागील घटना आणि ऐतिहासिक वास्तूची माहिती देते. हे सांगताना आनंद होत असे. त्यामुळे प्रत्येकाला माझ्याबद्दल वेगळेपणा वाटतो. एलोरा ही वास्तू कशी आहे, ती पाहण्यासाठी माझी मित्रमंडळी उत्सुक असते. मलाही या वास्तूला भेट देण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता औरंगाबादेत पोहोचल्यामुळे ही वास्तू केव्हा पाहीन आणि डोळ्यात साठवून ठेवेन, असे झाले आहे. भारतातील एका वास्तूचे नाव मला दिले आहे. यामुळे भारताविषयीच्या माझ्या भावना वेगळ्या आहेत. मी खूप उत्साहित आहे. अजिंठ्याविषयीसुद्धा खूप ऐकले. आता प्रत्यक्षात पाहण्याची वेळ आली आहे.
 -एलोरा अ‍ॅने मॉर्गन, अमेरिकेतील दाम्पत्याने एलोरा नाव ठेवलेली मुलगी 

Web Title: The American couple named child 'Ellora' after visiting caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.